वार्ताहर / राजापूर
सासू-सूनांमध्ये सुसंवाद घडवून आणणाऱया स्टार प्रवाह वाहीनीवरील ‘सून सासू सून’ या कार्यक्रमामध्ये राजापूरातील दिक्षित आणि गोरे कुटुंबातील सासू-सूनांचे नाते उलगडणार आहे. या कार्यक्रमात निवेदन करणारे प्रसिध्द अभिनेता पुष्कार श्रोत्री यांनी नुकतीच राजापूर येथे येऊन या दोन्ही कुटुंबातील सासू-सूनांशी सुसंवाद साधला.
स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं सासू सुनेचं गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त सुसंवाद. सासू-सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे, अभिनेता पुष्कार श्रोत्री.
11 जानेवारीपासून सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होत आहे. या कार्यक्रमामध्ये राजापूर शहरातील भटाळी येथील .दिपाली दिलीप दिक्षित व निलीमा गोरे यांनी सहभाग नोंदविला होता. या दोन्ही कुटुंबातील सासू-सूनांमधील नाते उलगडण्यासाठी पुष्कार श्रोत्री सोमवारी राजापूरात आले होते. दिक्षित कुटुंबामध्ये दिपाली दिक्षित, त्यांची सून स्वाती निखिल दिक्षित यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल या सासू सूनांना स्टार प्रवाह वाहिनीकडून सोन्याची नथ, नारायण पेठ साडी भेट देण्यात आली.
दरम्यान प्रसिध्द अभिनेता पुष्कार श्रोत्री राजापूरात आल्याची माहिती मिळताच अनेकांनी कार्यक्रम स्थळी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. काहींनी तर त्यांच्यासोबत सेल्फीही घेतली.