ओएनजीसी टर्मिनलला लागली आग : 3 स्फोटही झाल्याची प्रत्यक्षदर्शीनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरातच्या सूरतमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू निगमच्या प्रकल्पात गुरुवारी पहाटे सुमारे 3 वाजता भीषण आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने त्याच्या ज्वाळा सुमारे 7 किलोमीटर अंतरावरूनही दिसून येत होत्या. प्रकल्पात 3 स्फोट झाल्याने नजीकच्या परिसरात अफरातफरीची स्थिती निर्माण झाली. सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या दुर्घटनेत 3 कर्मचारी बेपत्ता झाल्याचे समजते. प्रकल्पाचे अधिकारी आगीमागील कारणांचा शोध घेत आहेत.
प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱया लोकांनी मोठय़ा स्फोटाचे आवाज ऐकले तसेच आकाशात आगीचे गोळे त्यांना दिसून आले आहेत. आगीच्या ज्वाळा 25-30 फूट उंचीपर्यंत दिसून आल्या आहेत. प्रकल्पातील आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने परिसरातील लोकांनी घाबरण्याची गरज नाही असे विधान सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी केले आहे.
मुंबईहून सूरतपर्यंत येणाऱया गॅस पाइपलाइनच्या टर्मिनलमध्ये ही आग लागली होती. परंतु आग लागताच व्हॉल्व बंद करण्यात आल्याने गॅसचा पुरवठा थांबला आणि एक भीषण दुर्घटना टळली आहे. जेथे आग लागली होती, तेथे दबावाच्या मदतीने वायू बाहेर काढण्यात आला, याचमुळे आगीच्या ज्वाळा 25-30 फूट उंचीपर्यंत दिसून आल्या आहेत.
प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक ही चिमणी तयार करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या मुख्य टर्मिनलपासून ती सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. याचा वापर आपत्कालीन स्थितीत वायू बाहेर काढून हवेतच तो जाळून नष्ट करण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकल्पातील वायू बाहेर काढला जात असल्याने प्रकल्पात आग फैलावत नाही.
19 किमीमध्ये फैलावलाय प्रकल्प
ओएनजीसीचा हा प्रकल्प सूरतनजीक हजीरा औद्योगिक क्षेत्रात सुमारे 19 किलोमीटर क्षेत्रात फैलावलेला आहे. ओएनजीसीकडून एलपीजी, नाफ्ता, एसकेओ, एटीएफ आणि एचएसडीएन प्रोपेन गॅस तयार केला जातो.
हजारो जणांना रोजगार
हजीरा औद्योगिक क्षेत्रात गॅससह अनेक अन्य प्रकल्पही आहेत. यात सूरत जिल्हय़ातील डुमस, भीमपोर, गवीयर, भाटपोर यासारख्या गावातील लोक हजारोंच्या संख्येत काम करतात. दुर्घटनेनंतर तेथील 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्प पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.
मोदींनी घेतली माहिती
दुर्घटनेचे गांभीर्य पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच तत्काळ आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
3 कर्मचारी बेपत्ता
सुरक्षा व्यवस्था पाहता परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे. प्रकल्पाचे 3 कर्मचारी बेपत्ता असून यात एक सुरक्षारक्षक, कामगार आणि लाइनमनचा समावेश असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.