25 हून अधिक मजुरांची स्थिती गंभीर
सूरत : गुजरातच्या सूरत शहरात विषारी वायूमुळे 6 लोकांचा मृत्यू ओढवला आहे. यात नजीकच्या एका प्रिटिंग मिलचे कामगार आणि मजूर सामील आहेत. तर या दुर्घटनेत 25 हून अधिक लोकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिलबाहेर रसायनाने भरलेला टँकर उभा होता. याचा पाइप ड्रेनेज लाइनमध्ये टाकण्यात आला होता, यातून बाहेर पडलेल्या रसायनांमधील रिऍक्शनमुळे विषारी वायू निर्माण होत तो परिसरात फैलावल्याचा दावा प्रिटिंग मिलच्या प्रॉडक्शन मॅनेजरने केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.