कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा परिणाम म्हणून, भारताच्या माननीय पंतप्रधानांकडून 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. मराठी मनोरंजन विश्वावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद आहे. नेहमी व्यस्त असणाऱया कलाकारांना स्वत:साठी थोडा मोकळा वेळ मिळालेला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हा वेळ सत्कारणी लावायचा निश्चय केलेला आहे.
आवडीचे अनेक खाद्यपदार्थ करण्यात वेळ घालवण्याचे तिने ठरवले आहे. अर्थात, चमचमीत पदार्थ खात असताना, आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची सुद्धा ती काळजी घेत आहे. जिम बंद असण्याचा कुठलाही परिणाम तिच्या व्यायामावर झालेला नाही. सूर्यनमस्कार घालत असतानाचा तिचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झालेला आहे. आरोग्य उत्तम राहावं यासाठी ती दिवसाला 108 सूर्यनमस्कार घालत असल्याचं म्हटलं जात आहे. स्वत:च्या फिटनेसची उत्तम काळजी घेत असलेली सोनाली, अनेकांसाठी आदर्श सुद्धा ठरली आहे. अनेकांच्या गळय़ातील ताईत असलेल्या सोनालीकडून, तिचे चाहते फिटनेसचे धडे घेत आहेत. या फिट अँड फाईन सोनालीचे सध्या बरेच कौतुक होत आहे.