भारताचा विंडीजवर मालिकाविजय, सुर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, प्रसिद्ध कृष्णाचे 12 धावात 4 बळी,
अहमदाबाद / वृत्तसंस्था
12 धावात 4 बळी घेणाऱया प्रसिद्ध कृष्णाचा धडाकेबाज, तिखट मारा व सुर्यकुमार यादव (64), केएल राहुलच्या (49) समयोचित फलंदाजीच्या बळावर भारताने विंडीजचा 44 धावांनी फडशा पाडला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारताला निर्धारित 50 षटकात 9 बाद 237 धावांवर समाधान मानावे लागले होते. पण, प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 46 षटकात अवघ्या 193 धावांमध्येच गारद झाला. उभय संघातील तिसरी व शेवटची वनडे याच ठिकाणी उद्या (शुक्रवार, दि. 11) होईल.
विजयासाठी 238 धावांचे आव्हान असताना विंडीज सलामीवीर शाय होप व ब्रेन्डॉन किंग यांनी 32 धावांची सलामी दिली. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने किंग व ब्रेव्हो यांना लगोलग बाद करत विंडीजला धक्के दिले. शाय होप (27) चहलचा बळी ठरला आणि विंडीजची 17 षटकात 3 बाद 52 अशी स्थिती झाली.
हंगामी कर्णधार निकोलस पूरनवर विंडीजच्या बऱयाच आशा होत्या. मात्र, तो ही 9 धावांवर प्रसिद्धचा बळी ठरला. जेसॉन होल्डरला (2) शार्दुलने बाद केले. आणि 22 षटकात विंडीजचा निम्मा संघ 76 धावांमध्येच तंबूत परतला.
ब्रूक्स व होसेन यांनी 6 व्या गडय़ासाठी 41 धावा जोडल्या असल्या तरी हुडाने ब्रूक्सला बाद करत ही जोडी फोडली. हुडासाठी हा वनडेतील पहिला बळी ठरला. अकिल होसेन (34), ओडियन स्मिथ (24) व ऍलन (13) देखील स्वस्तात बाद झाले. भारताने अंतिमतः हा सामना 44 धावांनी जिंकला.
सुर्यकुमारचे अर्धशतक
प्रारंभी, सुर्यकुमार यादवने 64 धावांची खेळी साकारल्यानंतरही भारताला निर्धारित 50 षटकात 9 बाद 237 धावांवर समाधान मानावे लागले होते. यजमान संघ आघाडी लाईनअप कोसळत राहिल्याने एकवेळ 3 बाद 43 असा गडगडला होता. मात्र, सुर्यकुमारने उपकर्णधार केएल राहुलच्या साथीने 91 धावांची भागीदारी साकारत डाव सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलचे (49) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले असले तरी त्याची खेळी भारतासाठी विशेष महत्त्वाची ठरली.
दुसरे अर्धशतक झळकावणाऱया सुर्यकुमार यादवने संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधला. त्याच्या 83 चेंडूतील खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला. फलंदाजीला प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याची ही खेळी विशेष स्पृहणीय ठरली.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (5) जलद गोलंदाज रोशच्या वाईडिश चेंडूवर स्वस्तात बाद झाला. त्याने शाय होपकडे सोपा झेल दिला. भारतात आपली 100 वी वनडे खेळणाऱया विराट कोहली व रिषभ पंत यांनी प्रत्येकी 18 धावा जमवल्या. रिषभ पंत वनडे क्रिकेट प्रकारात प्रथमच सलामीला उतरला. पण, ही चाल फारशी फळली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.
विराट कोहलीने पाचव्या षटकात रोशला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह फटकावत पहिला चौकार वसूल केला. नंतर त्याने स्क्वेअरच्या मागे कटचा फटका लगावत दुसरा चौकार फटकावला. रोश व अल्झारी जोसेफ (2-36) यांनी काटेकोर मारा केल्याने भारतीय फलंदाजांना फारशी मोकळीक मिळाली नाही. पंतने डीप मिडविकेटवरुन आपल्या ट्रेडमार्क पूल फटक्यावर आपला पहिला चौकार नोंदवला. मात्र, नंतर पेसर ओडियन स्मिथने (2-29) पंत व कोहली या दोघांनाही 12 व्या षटकात बाद केले आणि भारताची 3 बाद 43 अशी स्थिती झाली.
पंतने पूलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेसॉन होल्डरकडे झेल दिला तर माजी कर्णधार विराटने शाय होपकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर सुर्यकुमार यादव व केएल राहुल यांनी खेळाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेत धावफलक हलता ठेवण्याला प्राधान्य दिले. या जोडीने भारताला 25 षटकाअखेर 3 बाद 91 धावांपर्यंत नेले. राहुलने 48 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. मात्र, नंतर त्याला धावचीत होत परतावे लागले. सुर्यकुमारने वॉशिंग्टन सुंदरसमवेत पाचव्या गडय़ासाठी आणखी 43 धावा जोडल्या. वॉशिंग्टन सुंदरने 24 धावा जमवल्या.
अर्धशतकवीर सुर्यकुमारने 39 व्या षटकात जोसेफकडे सोपा झेल दिला. फॅबियन ऍलनचा (1-50) हा या सामन्यातील एकमेव बळी ठरला. पुढे दीपक हुडाच्या 25 चेंडूतील 29 धावांच्या खेळीमुळे भारताला सव्वादोनशे धावांच्या उंबरठय़ावर पोहोचता आले. यजमान भारतीय संघाला शेवटच्या 10 षटकात केवळ 54 धावांवर समाधान मानावे लागले होते. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफ व ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. होप, गो. रोश 5 (8 चेंडू), रिषभ पंत झे. होल्डर, गो. स्मिथ 18 (34 चेंडूत 3 चौकार), विराट कोहली झे. होप, गो. स्मिथ 18 (30 चेंडूत 3 चौकार), केएल राहुल धावचीत (होसेन-होप) 49 (48 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), सुर्यकुमार यादव झे. जोसेफ, गो. ऍलेन 64 (83 चेंडूत 5 चौकार), वॉशिंग्टन सुंदर झे. जोसेफ, गो. होसेन 24 (41 चेंडूत 1 चौकार), दीपक हुडा झे. होसेन, गो. होल्डर 29 (25 चेंडूत 2 चौकार), शार्दुल ठाकुर झे. ब्रूक्स, गो. जोसेफ 8 (15 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद सिराज झे. होप, गो. जोसेफ 3 (5 चेंडू), यजुवेंद्र चहल नाबाद 11 (10 चेंडूत 1 चौकार), प्रसिद्ध कृष्णा नाबाद 0 (3 चेंडू). अवांतर 8. एकूण 50 षटकात 9 बाद 237.
गडी बाद होण्याचा क्रम
1-9 (रोहित, 2.6), 2-39 (रिषभ, 11.1), 3-43 (विराट, 11.6), 4-134 (केएल राहुल, 29.4), 5-177 (सुर्यकुमार, 38.5), 6-192 (वॉशिंग्टन, 41.6), 7-212 (शार्दुल, 45.6), 8-224 (सिराज, 47.3), 9-226 (हुडा, 48.1).
गोलंदाजी
केमर रोश 8-0-42-1, अल्झारी जोसेफ 10-0-36-2, ओडियन स्मिथ 7-0-29-2, जेसॉन होल्डर 9-2-37-1, अकिल होसेन 6-0-39-1, फॅबियन ऍलन 10-0-50-1.
विंडीज ः शाय होप झे. यादव, गो. चहल 27 (54 चेंडूत 3 चौकार), ब्रेन्डॉन किंग झे. पंत, गो. प्रसिद्ध कृष्णा 18 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), डॅरेन ब्रेव्हो झे. पंत, गो. कृष्णा 1 (3 चेंडू), ब्रूक्स झे. यादव, गो. हुडा 44 (64 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), निकोलस पूरन झे. शर्मा, गो. कृष्णा 9 (13 चेंडूत 1 षटकार), जेसॉन होल्डर झे. हुडा, गो. शार्दुल 2 (10 चेंडू), अकिल होसेन झे. पंत, गो. शार्दुल 34 (52 चेंडूत 3 चौकार), फॅबियन ऍलन झे. पंत, गो. सिराज 13 (22 चेंडूत 1 षटकार), ओडियन स्मिथ झे. कोहली, गो. वॉशिंग्टन सुंदर 24 (20 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), अल्झारी जोसेफ नाबाद 7 (15 चेंडू), केमर रोश पायचीत गो. प्रसिद्ध कृष्णा 0 (6 चेंडू). अवांतर 14. एकूण 46 षटकात सर्वबाद 193.
गडी बाद होण्याचा क्रम
1-32 (ब्रॅन्डॉन, 7.3), 2-38 (डॅरेन, 9.1), 3-52 (होप, 16.2), 4-66 (पूरन, 19.4), 5-76 (होल्डर, 21.6), 6-117 (ब्रूक्स, 30.5), 7-159 (ऍलन, 38.5), 8-159 (अकिल, 39.2), 9-193 (ओडियन, 44.6), 10-193 (रोश, 45.6).
गोलंदाजी
सिराज 9-1-38-1, शार्दुल ठाकुर 9-1-41-2, प्रसिद्ध कृष्णा 9-3-12-4, यजुवेंद्र चहल 10-0-45-1, वॉशिंग्टन सुंदर 5-0-28-1, दीपक हुडा 4-0-24-1.