हुक्केरी येथील प्रकार : जोल्ले उद्योग समूहाचे सॅनिटायझर केंद्र हटविले
वार्ताहर/ हुक्केरी
हुक्केरी शहरातील हळदगिरी भागात जोल्ले उद्योग समूहामार्फत उभारण्यात आलेले सॅनिटायझर केंद्र तहसीलदारांच्या उपस्थितीत हटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी घडला. सदर कारवाई नगरपरिषद कर्मचारी व पोलीस अधिकाऱयांनी केली. दरम्यान सदर केंद्र हटविण्यात आल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होताना विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी येथील हळदगिरी भागात जोल्ले उद्योग समूहातर्फे सॅनिटायझर फवारणी केंद्राची उभारणी करण्यात आली होती. याची माहिती मिळताच तहसीलदार अशोक गुराणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मोहन जाधव हे सदर ठिकाणी दाखल झाले. यावेळी कोणतीही चौकशी करण्याऐवजी सदर फवारणी केंद्र हटविण्यात येणार असल्याचे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांना याची माहिती फोनद्वारे देण्यात आली. त्यावेळी खासदार जोल्लेंनी तहसीलदार गुराणी यांच्याकडे फोन देण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी फोन देण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदारांनी फोन घेतला नाही. त्याऐवजी तत्काळ घटनास्थळावरून निघून जाणे पसंत केले.
यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस व नगरपरिषद कर्मचाऱयांनी सदर फवारणी केंद्र हटवत सदर साहित्य नगरपरिषद आवारात ठेवण्यात आले. एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच प्रशासन व सामाजिक संस्थांतर्फे अनेक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. असे असताना हुक्केरीत मात्र अधिकाऱयांनाच सॅनिटाझयर केंद्राचे वावडे आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया
तहसीलदारांचे प्रांताधिकाऱयांकडे बोट यासंदर्भात तहसीलदार अशोक गुराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय नगरपरिषदेच्या अखत्यारित येत असल्याने यासंदर्भात नगरपरिषद प्रशासक असलेल्या प्रांताधिकाऱयांना विचारा, असे सांगत हात वर केले. तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मोहन जाधव यांनी आपला फोन बंद ठेवल्याचे दिसून आले.