उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीत घट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍपल आणि सॅमसंग यासह इतर कंपन्या भारताबाहेर विदेशात इलेक्ट्रॉनिक सुटे भाग व उत्पादने निर्यात करत आहेत. स्थानिक मागणीवर झालेला परिणाम पाहता आता या कंपन्यांना भारताबाहेरील देशांच्या मागणीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
अनेक मोठय़ा इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना कोरोना दुसऱया लाटेचा सामना करावा लागतो आहे. दळणवळणाबाबत निर्बंध आणणारे लॉकडाऊनसारखे पाऊल या कंपन्यांना अडचणीचे ठरते आहे. इलेक्ट्रॉनिक्स शोरूम्स जवळपास लॉकडाऊन असणाऱया शहरात बंद आहेत. त्यामुळे तेथून होणारी उत्पादनांची मागणी चांगलीच प्रभावीत होते आहे. ऐन उन्हाळय़ाचा हंगामही यंदा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या कंपन्यांना गमवावा लागतो आहे. एलजी, पॅनासोनिक, विवो, ओप्पो, हायर व गोदरेज यांनी आपले प्लांट एकतर बंद केले आहेत किंवा उत्पादन क्षमता कमी केली आहे. ऍपल व सॅमसंग या कंपन्यांनी भारतातून इतर देशात सुटे भाग, उत्पादने निर्यात केली आहेत. यांच्या उत्पादनांवरही 25 ते 40 टक्के इतका प्रभाव दिसला आहे. देशांतर्गत उत्पादनांची मागणी लॉकडाऊनच्या कारणास्तव घटली आहे. निर्यातीच्या ऑर्डरवरच सदरच्या कंपन्यांना समाधान मानावे लागत आहे.