मुख्य भूमिकेसाठी विक्की कौशलची निवड
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटातील मुख्य नायिकेचे नाव निश्चित झाले आहे. दंगल गर्ल फातिमा सना शेख या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेसाठी विक्की कौशलचे नाव निश्चित झाले आहे. रॉनी स्क्रूवाला यांच्या या चित्रपटाला मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन लाभणार आहे.
भारताचे पहिले फील्ड मार्शल माणेकशॉ यांना सॅम बहादुर या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व करत विजय मिळवून दिला होता. त्यांना पद्मविभूषण आणि त्यानंतर फील्ड मार्शल या पदवीने गौरविण्यात आले होते.
या चित्रपटाचे सध्या निर्मितीपूर्व काम सुरू आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाची घोषणा 2017 मध्ये करण्यात आली होती. चित्रपटाच्या शीर्षकाची माहिती विक्कीनेच सोशल मीडियावरून दिली होती. 2019 मध्ये विक्कीने स्वतःचा लुक सादर केला होता. या चित्रपटामुळेच रॉनी स्क्रूवाला यांच्या ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाचे काम रोखण्यात आले आहे. याचबरोबर विक्की कौशल हा मिस्टर लेले या चित्रपटात देखील काम करत आहे.