वृत्तसंस्था / सिडनी
क्रिकेटच्या चेंडूला लकाकी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱया सॅलिव्हा वर ऑस्ट्रेलियाकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा संस्थेतर्फे वैद्यकीय तज्ञ, क्रीडा संघटना तसेच फेडरल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तयार केलेल्या नियमावलीमध्ये ही सूचना देण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घेतले असून याचा प्रसार युरोपियन देशामध्ये जलद होत आहे. क्रिकेट चेंडूवरील घामामुळे लकाकी कमी होते. ती पुन्हा आणण्यासाठी ऑस्ट्रेलियात सॅलिव्हाचा वापर केला जातो. कोव्हिड-19 पासून खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सॅलिव्हाचा वापर करण्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तसेच ऑस्ट्रेलियन शासनाने बंदी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या शासनातर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये वैद्यकीय तज्ञ तसेच क्रीडा अधिकाऱयांच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या नियमावलीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
ऑस्ट्रेलियातील क्रीडा हालचाली पुन्हा सुरू करण्याकरिता या नियमावलीच्या आधारे सर्व स्तरावरील क्रीडास्पर्धाकरिता नवी रूपरेषा तयार करण्यात आली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी जॉन ऑर्चर्ड यांनी सांगितले. ही नवी रूपरेषा तयार करण्यामध्ये ऑर्चर्ड यांचा वाटा महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस् (एआयएस) यांच्या प्रेमवर्कमध्ये अ स्तरावरील होणाऱया क्रीडास्पर्धांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. यानंतर ब आणि क स्तरावरील क्रीडास्पर्धांना ऑस्ट्रेलियन शासनातर्फे परवानगी दिली जाईल.
सध्या तरी ऑस्ट्रेलियातील सर्व क्रीडास्पर्धा कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतातील आयपीएल स्पर्धा, ब्रिटनमधील इंग्लीश प्रिमियर लीग आणि ला लीगा फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दुसऱया महायुद्धानंतर पहिल्यांदाच लंडनमधील विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करावी लागली आहे.