वृत्तसंस्था /बॅसेटेअर
वेमर पार्क मैदानावर बुधवारी यजमान सेंट किट्स-नेव्हीस पॅट्रिअट्स संघाने हिरो पुरस्कृत कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेचे पहिल्यांदाच अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात सेंट किट्स-नेव्हीस संघाने सेंट लुसिया किंग्जचा शेवटच्या चेंडूवर तीन गडी राखत पराभव केला. सेंट लुसियाच्या रॉस्टन चेसला ‘मालिकावीर’ तर सेंट किट्सच्या डॉमिनिक ड्रेक्सला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आले.
या सामन्यात सेंट लुसिया किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 159 धावा जमविल्या. सेंट लुसिया संघातील कॉर्नवॉलने 32 चेंडूत 43, चेसने 40 चेंडूत 43, किमो पॉलने 21 चेंडूत 39 आणि टिम डेव्हिडने 10 चेंडूत 10 तसेच कर्णधार फ्लेचरने 7 चेंडूत 11 धावा जमविल्या. पॉलने एका षटकांत सलग तीन षटकार ठोकल्याने सेंट लुसियाला 159 धावांपर्यंत मजल मारता आली. सेंट किट्सतर्फे फवाद अहमद आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी दोन तर ऍलन, ड्रेक्स आणि जोन रुस जॅगेसर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट किट्स-नेव्हीस संघाने 20 षटकांत 7 बाद 160 धावा जमवित 3 गडी राखत शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळविला. सेंट किट्सच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकांतील चौथ्या चेंडूवर रॉस्टन चेसने सलामीच्या गेलचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. त्यानंतर लेवीस आणि दा सिल्वा यांनी 25 धावांची भर घातली. वहाब रियाझने लेवीसला 6 धावांवर झेलबाद केले. दा सिल्वा आणि रूदरफोर्ड या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 45 धावांची भर घातली. केसरिक विल्यम्सने दा सिल्वाला झेलबाद केले. त्याने 32 चेंडूत 37 धावा जमविल्या. जोसेफने स्वतःच्याच गोलंदाजीवर रूदरफोर्डला 25 धावांवर झोलबाद केले. कर्णधार ड्वेन ब्रॅव्हो 8 धावांवर बाद झाला. सेंट किट्सची स्थिती यावेळी 5 बाद 95 अशी होती पण त्यानंतर ड्रेक्सने फॅबियन ऍलेनसमवेत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला.
ऍलनने 18 चेंडूत 20 तर डेक्सने 6 चौकारांसह 24 चेंडूत नाबाद 48 धावा तडकावल्या. सेंट लुसियातर्फे वहाब रियाझने 2 तर चेस, जोसेफ, वाईज आणि विल्यम्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
सेंट लुसिया किंग्ज 20 षटकांत 7 बाद 159 (कॉर्नवॉल 43, चेस 43, पॉल 39, डेव्हिड 10, फ्लेचर 11, फवाद अहमद आणि नसीम शहा प्रत्येकी 2 बळी, ऍलेन, डेक्स आणि जॅगेसर प्रत्येकी एक बळी). सेंट किट्स- नेव्हीस पॅट्रिअट्स 20 षटकांत 7 बाद 160 (ड्रेक्स नाबाद 48, दा सिल्वा 37, रूदरफोर्ड 25, ऍलेन 20, लेवीस 6, वहाब रियाझ 2-36, चेस, जोसेफ, वाईज, विल्यम्स प्रत्येकी एक बळी).