सेंच्युरी चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेट (डीपी) स्कुलच्या 100 वर्षानिमित्त सेंच्युरी चॅम्पियन चषक आंतर शालेय मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, इस्लामिया, संत मीरा संघानी विजयी सलामी दिली.
सुभाष चंद्र बोस लेले मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, पुरस्कर्ते सुधेंद्र घाळी, तेजस कदम, मुख्याध्यापिका रोजमा, क्रीडा शिक्षक सिल्विया डिलीमा, अमित पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजय रेडेकर, ओमकार, योगेश सांबरेकर आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या मुलींच्या सामन्यात सेंट जोसेफ संघाने संजय घोडावत संघाचा 7-0 असा पराभव केला. या सामन्यात सिल्विया गोम्सने 4 गोल तर दिशा डोंगरे, तनिशा लगाडे, श्रीलीन पाडिवाल यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
मुलांच्या पहिल्या सामन्यात सेंट पॉल्सने केंद्रीय विद्यालयचा 5-1 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे आदी बिलानीने 2, नावील शेखने 2, उजफिया पठानने 1 गोल केला. केंद्रीय विद्यालयतर्फे ओमने एकमेव गोल केला. दुसऱया सामन्यात इस्लामियाने एम. व्ही. हेरवाडकरचा 1-0 असा निसटता पराभव केला. इस्लामियातर्फे हुसेन अत्तारने एकमेव गोल केला. चौथ्या सामन्यात संत मीराने संजय घोडावत संघाचा 6-0 असा पराभव केला. त्यात रेहान नदाफने 3, अरिहंत पाटील, स्वयंम काकतीकर व प्रणव देसाई यांनी प्रत्येकी 1 गोल केला.