निफ्टीही 509 अंकांनी नुकसानीत – जागतिक बाजारातील विक्रीचा प्रभाव
मुंबई
जगभरात पुन्हा कोरोना विषाणूचा नवा संसर्ग येत असल्याच्या बातम्यामुळे भीतीच्या वातावरणामुळे आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली यासोबतच जागतिक बाजारांमधील विक्रीचाही प्रभाव भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पहावयास मिळाले आहे. बीएसई सेन्सेक्स तब्बल 1,688 अंकांनी गडगडला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर मात्र बीएसई सेन्सेक्स 1,687.94 अंकांनी घसरुन निर्देशांक 57,107.15 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 509.80 अंकांनी नुकसानीसह निर्देशांक 17,026.45 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यासोबत मारुती सुझुकी, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टायटन यांचे समभागही घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र लाभात राहिले आहेत.
प्रमुख घडामोडींचा परिणाम
कोरोना19 या विषाणूचा जगभरातील काही देशांमध्ये नव्या विषाणूचा पुन्हा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे निर्माण झालेली भीती चिंता याचा परिणाम भारतीय बाजारावर झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हे चालू आठवडय़ात तब्बल चार टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. या बातमीमुळे प्रवासांवर बंदी येणार का? तसेच जगातील काही देशांमध्ये अर्थव्यवस्थेबाबत काळजीचे कारण बनले आहे. यासोबतच विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीमध्ये विक्रीचा कल राहिला आहे. यामुळे देशातील बाजार मोठय़ा प्रमाणात प्रभावीत होत बंद झाला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
जगातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, हॉगकॉगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की हे मात्र 2.67 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूट 5.62 टक्क्यांनी घसरुन 77.60 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.