प्रकरणाला लागले वेगळे वळण, पीडित महिलेची बिहार येथील पोलीस स्थानकात तक्रार
प्रतिनिधी/ पणजी
सध्या गाजत असलेल्या कथित सेक्स स्कँडलला आता अचानक वेगळे लागले असून सदर वासनाकांड 15 दिवसांच्या आता उघड करून एका मंत्र्याचे नाव जाहीर करणार, असे सांगणाऱया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या विरुद्ध एका महिलेने बिहार येथील पोलीस स्थानकात तक्रार दिल्याची माहिती लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी या मुंबई येथील संस्थेच्यावतीने ऍड. संजीव पुनळेकर यांनी दिली.
सदर पीडित महिलेकडून या संघटनेकडे तक्रार येताच गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर, दामोदर, दिवकर, व यशवंत धोंगसेकर यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आली आहे. पीडित महिलेचे नाव वॉटसऍप् मेसेजद्वारे सामाजिक माध्यमात उघड केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचे ते म्हणाले.
सदर महिला गोव्यात राहत होती. ती 31 वर्षीय असून 10वी पर्यंत शिक्षण झालेले आहे. अपघातात पतीचे निधन झाल्यानंतर एका मंत्र्याने तिला मदत केली. त्या मंत्र्याविरुद्ध तिची कोणतीच तक्रार नाही, असे ऍड. पुनळेकर यांचे म्हणणे आहे. 2018 साली त्या महिलेला 10 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्या संभाषणाचे व्हिडीओ बनविण्यात आले. या व्हिडीओच्या माध्यमातून नंतर त्या कथित मंत्र्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रकार घडला. त्या महिलेला 2 लाख रुपये देण्यात आले, असे सांगताना ती महिला आता बिहारमध्ये राहते. तिचे नव्याने लग्न झाले असून तिला मूलही आहे. तिच्या नावाच वापर करून भलताच कोणीतरी खंडणी मागत असल्याचे समजताच तिने या वकील संघटनेकडे नोव्हेंबरमध्ये तक्रार दिली व आता पोलीस स्थानकात एक एफआयआर सादर केल्याचे ते म्हणाले.
त्या कथित मंत्र्याचे नाव उघड करण्यास त्यांनी नकार दिला व या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. एका पीडित महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन तिचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करण्याचा हेतू फार वाईट आहे. ही वृत्ती खोटी असल्याने या संघटनेने पर्दाफाश करण्यासाठी हस्तक्षेप केल्याचे ते म्हणाले.
कोठडीची हवा खायला लावू
लैंगिक छळ प्रकरण उघड करण्याच्या हेतूने एका महिलेचे नाव उघड करणे, अजामीनपात्र गुन्हा ठरतो. त्यामुळे नाव उघड करून बदनामी केलेल्या सर्व संशयितांना कोठडीची हवा खायला लावू, असे ऍड. संजीव पुनळेकर यांनी यावेळी जाहीर केले.
कथित मंत्र्याला संरक्षण देण्याच्या हेतूने ऍड. पुनळेकर पत्रकार परिषद घेत आहेत व सदर वासनाकांड दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत का, असे विचारले असता या वासनाकांडाशी आपला संबंध नसून तो कोण मंत्री हेही आपल्याला माहीत नाही. त्या महिलेची लैंगिक छळाची कोणतीच तक्रार नाही. तरीपण तिचे नाव त्यात गोवून ते समाजमाध्यमावर उघड केल्याचा त्या महिलेचा आरोप आहे. तशी तक्रारही तिने बिहार येथील एका पोलीस स्थानकात दिल्याचे ते म्हणाले.
गिरीश चोडणकरांचाही आरोप
कथित वासनाकांडात गिरीश चोडणकर यांनी कोणत्याच महिलेचे नाव घेतलेले नाही. तसेच मंत्री कोण तेही जाहीर केलेले नाही. तरी त्यांना नोटेस बजावणे हा गुन्हा नाही का, असे ऍड. पुनळेकर यांना विचारले असता ऍड. पुनळेकर उलट पत्रकारांवरच घसरले व पत्रकार गिरीश चोडणकर यांचे हस्तक आहेत का, असा आरोप केला. त्यामुळे पत्रकार परिषदेत पत्रकार आणि ऍड. पुनळेकर यांच्यात बराच वादविवाद झाला.
गिरीश चोडणकर यांचा आपल्यावर आरोप असल्यास त्यांनी आपल्याविरुद्ध पोलीस तक्रार द्यावी. आपण या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे ते म्हणाले.