प्रतिनिधी / सेनापती कापशी
कागल तालुक्यातील सेनापती कापशीसह तमनाकवाडा गावच्या वेशीत आज सकाळी टस्कर हत्तीने प्रवेश केल्याने एकच धावपळ उडाली. हत्ती आणि त्यातच टस्कर हत्ती परिसरात प्रथमच आल्याने बघ्यांची गर्दी प्रचंड झाली. टस्करमुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे. दुपारपर्यंत नाईकवाडे यांच्या मळ्यातील उभ्या उसाच्या फडात मुक्काम ठोकला आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
आज पहाटे सहाच्या सुमारास सेनापती कापशी गावच्या पूर्वेला जाधववाडी परिसरात टस्कर हत्तीचे दर्शन शेतकऱ्यांना झाले. त्यानंतर हा हत्ती सकाळी दहा वाजता शेतातून थेट तमनाकवाडा गावच्या वेशीत पोहचला. अचानक हत्तीचे दर्शन झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. सकाळी दहाची वेळ म्हणजे कामावर ये- जा करणाऱ्यासह रहदारीची वेळ होती. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली आणि हत्ती थेट पुन्हा शिवारातून सेनापती कापशी गावच्या हद्दीत आला. दुपारपर्यंत नाईकवाडे यांच्या मळ्यातील उसाच्या फडात ठाण मांडून होता. अधूनमधून त्याचा आवाज आणि हालचाल सुरु होती.
दरम्यान कागलसह आजरा, गडहिंग्लज येथील वनाधिकारी, कर्मचारी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना सूचना केल्या. हत्ती असलेल्या परिसरातून शेतकऱ्यांना घरी जाण्यास सांगीतले. मात्र हा हत्ती शांत आहे. पण उसाच्या फडाचे नुकसान करीत सुटला आहे.