पुणे / प्रतिनिधी :
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या वृत्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले आहे. शिवसेनेकडे एकनाथ खडसे यांना देण्यासारखं आहे तरी काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडय़ाला भेट देऊन अभिवादन केलं. त्यानंतर प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. आम्ही त्यांची नाराजी दूर केली आहे, त्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या बातमीमध्ये काही तथ्य नाही आहे.
तसेच शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय? कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली आहे. त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले. तरी देखील सोलापूर, सांगलीत आम्ही आलो आहोत यावरूनच समजून घ्यावे, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेवर यावेळी टीका केली.