वृत्तसंस्था/ कतार
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपला ‘फ्री स्कोरिंग फॉर्म’ पुढे चालू ठेवताना इंग्लंडने उप-उपान्त्यपूर्व फेरीत सेनेगलला 3-0 असे सहज पराभूत करून स्पर्धेच्या अंतिम आठ संघांत प्रवेश मिळविला. कतारच्या अल-बायत स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. आता उपान्त्यपूर्व फेरीत येत्या रविवारी गतविजेत्या फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात स्फोटक लढत होणार आहे.
सामन्यावर पूर्णतः वर्चस्व ठेवलेल्या इंग्लंडसाठी जॉर्डन हेंडरसन, हॅरी केन व बुकायो साका यांनी गोल केले. मध्यंतराला विजयी इंग्लंडचा संघ दोन गोलानी आघाडीवर होता. आफ्रिकन चॅम्पियन्सना सहज पराभूत करणाऱया इंग्लंडने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामन्यांतून तबाल 12 गोल प्रतिस्पर्धी संघावर केले आहेत. मागील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत केलेल्या 12 गोलांची इंग्लंडने सेनेगलविरूद्धच्या सामन्यात बरोबरी केली.
सेनेगलला पहिल्या सत्रात गोल करण्याच्या संधी होत्या. इंग्लंडचा गोल करण्यापूर्वी खेळ दिशाहीन होता. मध्यंतराला सात मिनिटांचा अवधी असताना इंग्लंडने दोन गोल केले. प्रथम 38 व्या मिनिटाला जॉर्डन हेंडरसनने गोल करून संघाचे खाते उघडले. या गोलने भांबावलेल्या सेनेगलविरूद्ध हॅरी केनने 52 व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाची आघाडी दोन गोलानी वाढविली तर दुसऱया सत्रात 57 व्या मिनिटाला बुकायो साकाने तिसरा गोल करून इंग्लंडचा विजय अधिक सोपा केला. केनचे आता 52 गोल झाले असून वेन रूनीच्या सर्वाधिक 52 गोलांची बरोबरी करण्यासाठी त्याला एका गोलची गरज आहे.
इंग्लंडने 21 सामन्यांत आतापर्यंत आफ्रिकन संघांविरूद्ध विजयी मालिका राखली असून यात आठ विश्वचषक सामन्यांचाही समावेश आहे. सेनेगलच्या ‘एक्झिट’ने यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत असणारा मोरोक्को हा एकमेव आफ्रिकन संघ शिल्लक आहे. या सामन्यात सेनेगलला त्यांच्या मिडफिल्डमध्ये खेळणारे इद्रिसा कुई आणि चिखूवू कुयाते यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली.
इद्रिसा सस्पेंड असल्याने आणि कुयाते हा पूर्ण तंदुरूस्त नसल्याने खेळू शकले नाहीत. इंज्युरीमुळे सादियो माने यालाही ही स्पर्धा चुकल्याने इंग्लंडच्या बचावफळीला सेनेगलचे स्ट्रायकर विशेष त्रास देऊ शकले नाहीत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील इंग्लंडच्या 20 वर्षांतील इतिहासात तिसऱयांदा इंग्लंडच्या बचावफळीने क्लिन शीट ठेवण्यात यश मिळविले.
पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंच्या चुकामुळे सेनेगलने चेंडू आपल्या ताब्यात ठेवला. अशाच एकदा केलेल्या चुकीमुळे बौलाई दियाने हाणलेला फटका इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने आपल्या डाव्या बाजूने झेपावत अडविला. त्यानंतर इंग्लंडने खेळाचा वेग वाढविला आणि 38 व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. सेनेगलच्या डाव्या बगलेतून फिल फोडेन व ज्युड बॅलिंगहमने रचलेल्या चालीवर जॉर्डन हेंडरसनने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदले व चेंडूला जाळीत सारले.
त्यानंतर लगेच हॅरी केनला इंग्लंडची आघाडी वाढविण्याची संधी प्राप्त झाली होती. यावेळी त्याने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला. यंदाच्या स्पर्धेत एकही गोल न केलेला इंग्लंडच्या या स्टार स्ट्रायकरने पहिल्या सत्रातील इंज्युरी वेळेत गोल करून आपला गोलचा दुष्काळ संपविला. यावेळी परत एकदा बॅलिंगहमने चेंडूवर ताबा मिळवत फोडेनकडे तो सोपविला. फोडेनने दिलेल्या पासवर कप्तान हॅरी केनने जबरदस्त फटका हाणून इंग्लंडच्या दुसऱया गोलची नोंद केली.
दोन गोलांच्या आघाडीनंतर दुसऱया सत्रात इंग्लंडचा खेळ अधिक बहरला. प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी या सामन्यात वेल्सविरूद्ध खेळलेल्या सामन्यातून फक्त एकच बदल करताना साका याला स्थान दिले होते. साकाने प्रशिक्षकांचा हा निर्णक अचूक ठरविताना 57 व्या मिनिटाला फोडेनच्या पासवर गोल केला आणि संघाची आघाडी तीनवर नेली.
मागील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविलेल्या इंग्लंडने बारा गोल केले होते. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत निर्भेळ खेळ केला आहे. अजुनही त्यांच्या एकाही खेळाडूला यलो कार्ड मिळालेले नाही तसेच सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरूस्तही आहेत. यामुळे रविवारी होणारी फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील लढत चुरसपूर्ण होणार हे कुणीही नाकारू शकणार नाहीत.