वार्ताहर/ राजापूर
वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या रायपाटण गावातील एका बातमीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात शिवसेनेचे माजी उपसभापती उमेश पराडकर, त्यांचे बंधू व अन्य पाचजणांनी रायपाटण सरपंच राजेश नलावडे व भाजपाचे पदाधिकारी संतोष गांगण यांना मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री रायपाटण गावी घडला. यामध्ये नलावडे व गांगण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पराडकर यांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उमेश पराडकर यांचे बंधू मंगेश पराडकर यांनीही राजेश नलावडे यांच्यासह अन्य तिघांविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपाटण सरपंच राजेश नलावडे व त्यांचे गावातील सहकारी संतोष गांगण हे शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान रायपाटण गावाबाबत वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीबाबत चर्चा करत होते. याचवेळी शिवसेनेचे माजी उपसभापती उमेश केशव पराडकर, मंगेश केशव पराडकर, अमोल अशोक शेटय़े, जितू मोहन गांगण, महेंद्र रवींद गांगण, महेश महादेव ताम्हणकर व बाबा कांबळी (सर्व रा. रायपाटण) यांनी बेकायदा जमाव करत नवालडे व गांगण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात नलावडे व गांगण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ तेथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी या सातहीजणांविरोधात भा.दं.वि.कलम 143, 147, 149, 188, 323, 279, 504 व कोवीड-19 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ निर्मूलन प्रतिबंधक कायद्याचा भंग अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. तर या प्रकरणी मंगेश केशव पराडकर यांनी राजेश नलावडे व संतोष गांगण यांच्याविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल केली. मी, माझे बंधू रायपाटण येथून जात असताना तेथे असलेल्या राजेश नलावडे, संतोष गांगण, संजय नलावडे व संदीप कोलते (सर्व रा. रायपाटण) यांनी रायपाटण गावातील वृत्तपत्रात आलेल्या बातमीबाबत आपणाला विचारणा करून व संशय घेत राग मनात धरून आपणाला व आपल्या सहकाऱयांवर हल्ला करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश पराडकर यांच्या तक्रारीवरून नलावडे, गांगण व अन्य दोन अशा चौघांजणांविरोधात भा. दं. वि. कलम 324, 323, 504 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण दूरक्षेत्राचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हेतेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही
या घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव व त्यांच्या सहकाऱयांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत नलावडे, गांगण यांची भेट घेतली व त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागित हलविले. शिवसेनेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपाच्यावतीने देण्यात आला आहे.