सेन्सेक्स 708 अंकांनी मजबूत : विदेशी वातावरणाचा फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
नवीन आर्थिक वर्षाचा (2022-23) प्रारंभ होताच पहिल्याच दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात मजबूत स्थिती राहिली आहे. यामध्ये विदेशी संस्थाकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे लिलाव झाला होता. प्रमुख कंपन्यांपैकी एचडीएफसी लि. रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या समभागातील तेजीच्या मदतीने दिवस अखेर सेन्सेक्स 708 अंकांची मजबूत कामगिरी करत बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 708.18 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी वधारुन तो 59,276.69 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 205.70 अंकांनी मजबूत होत 17,670.45 वर बंद झाल्याचे दिसून आले.
मुख्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, सनफार्मा, डॉ,रेड्डीज लॅब, टायटन आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजरातील स्थिती
आशियातील प्रमुख बाजारांपैकी दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की नुकसानीत राहिला. तर चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक व हाँगकाँगचा हँगसेंग लाभासह बंद झालेत. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.22 टक्क्यांनी वाढून 104.94 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाकडून निव्वळ लिलाव राहिल्याने जवळपास 3,088.73 कोटी रुपये मूल्याच्या समभागाची खरेदी झाली आहे.
काय सांगतात तज्ञ
देशातील शेअरबाजारात चालू आठवडय़ात सकारात्मक परतावा मिळाला आहे. दुसऱया बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दोन्ही देशांच्या चर्चेमधून निवळण्याचे संकेत निर्माण होत आहेत. याचा सकारात्मक लाभ हा जागतिक स्तरावरील इक्विटी बाजारावर मोठय़ा प्रमाणात झाल्याने देशातील बाजारात तेजीत राहिला असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले असले तरी दुसरीकडे आजपासून नवीन गुढीपाडव्याच्या शुभ महुर्तासोबत प्रारंभ होत असल्याच्या उत्साही वातावरणाच्या पार्श्वभूमीची किनार बाजाराला फायदेशीर ठरविण्यात कारणीभूत ठरल्याचे तज्ञांनी नमूद केले आहे.