मागील दिवसांमधील मोठी घसरण – रिलायन्स, इन्फोसिस नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बीएसई सेन्सेक्स तब्बल 456 अंकांनी पडझड होत बंद झाला आहे. शेअर बाजारात काही काळ सेन्सेक्सने उच्चांकी टप्पा प्राप्त केला होता. परंतु मजबूत नफावसुलीच्या कारणास्तव रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीत राहिल्याने सेन्सेक्स नुकसानीत बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीमुळे अंतिमक्षणी सेन्सेक्स कोसळला. निर्देशांक 61,259.96 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 152.15 अंकांसह 0.83 टक्क्यांच्या नुकसानीत 18,266.60 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी टायटनचे समभाग जवळपास 3 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि पॉवरग्रिड या कंपन्यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीसह बंद झाले आहेत. भारती एअरटेल, स्टेट बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मात्र तेजीत राहिले आहेत. आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की लाभात राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कम्पोजिट आणि दक्षिण कोरायाचा कॉस्पी घसरणीत राहिला आहे. युरोपमधील मुख्य बजारात दुपारपर्यंत बाजारात मिळता जुळता कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.82 टक्क्यांनी घसरुन 84.38 डॉलर प्रति बॅरेलवर आला आहे.
अन्य घडामोडी
प्रामुख्याने निवडक कंपन्यांचे मूल्य घसरल्याने निर्देशांक नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तेजीचे वातावरण राहिल्याने गुंतवणूकदारांनी याच क्षेत्रात गुंतवणूक केल्याचे पहावयास मिळाले आहे. आगामी काही दिवस शेअरबाजारांमध्ये असे चढउतार राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली. तरीही एकंदर परिस्थिती समाधानकारक आहे.