निफ्टीनेही नोंदवला नवा विक्रम – टीसीएस मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजाराने चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा टप्पा प्राप्त केला आहे. यामध्ये दिवसअखेर 593 अंकांची उसळी घेत सेन्सेक्सने नवीन 55,000 चा विक्रम नोंदवला आहे.
बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक शुक्रवारी दिवसअखेर 593.31 अंकांनी वधारुन 1.08 टक्क्यांची झेप घेत 55,437.29 वर स्थिरावला आहे. ट्रेडिंगच्या दरम्यान निर्देशांकाने 55,487.79 इतकी उच्चांकी झेप घेतल्याची नोंद करण्यात आली होती. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 164.70 अंकांच्या मजबुतीसोबत 1.01 टक्क्यांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 16,529.10 चा विक्रमी टप्पा प्राप्त करत बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसईमधील कंपन्यांमध्ये टीसीएसचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. याच्यासोबतच लार्सन ऍण्ड टुब्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा स्टील, बजाज ऑटो तसेच रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, डॉ.रेड्डीज लॅब, बजाज फायनान्स तसेच एनटीपीसीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये आशियातील चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की तसेच दक्षिण कोरियाचा कोस्पी हे घसरणीसह बंद झाले आहेत. युरोपीय बाजारात समाधानकारक स्थिती राहिली होती. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.10 टक्क्यांनी घसरुन 71.24 डॉलर प्रती बॅरेलवर आले आहे.
आयटी-आर्थिकच्या प्रभाव
भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून आयटी व आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सुधारणात्मक वातावरणामुळे बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. या मजबूत स्थितीमुळे बाजार नवनवीन टप्पे प्राप्त करत आहे.