गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले : निफ्टीतही घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
मागील जवळपास 10 दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील तेजीचा प्रवास अखेर चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी खंडित झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात जवळपास 41 हजाराच्या उच्चांकाकडे प्रवास करणाऱया सेन्सेक्सचा प्रवास घसरणीसह 39,700 वर पोहोचल्याचे पहावयास मिळाले. सदर प्रवासात निफ्टीलाही आपली तेजी गमवावी लागली आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 1066.33 अंकांनी घसरुन निर्देशांक 39,728.41 वर बंद झाला आहे तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 290.70 अंकांनी घसरून 11,680.35 वर बंद झाला आहे.
गुरुवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 3.3 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. तसेच बीएसईमधील कंपन्यांच्या बाजारमूल्यातही तब्बल 157.22 लाख कोटी रुपयांची घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये एकमेव एशियन पेन्ट्सचे समभाग तेजी नोंदवत बंद झाले आहेत. सोबत बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवर मात्र अमेरिकेकडून दुसऱयांदा आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु सध्या अमेरिकेने पॅकेज निवडणुकीआधी देणे शक्य नसल्याचे म्हटले असल्याचे सांगण्यात येते. याचा सर्व प्रभाव भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱया गुंतवणूकदारांवर झाला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मागील तीन आठवडय़ात शेअर बाजाराने सलगची तेजी नोंदवली होती. परंतु यामध्ये 29 सप्टेंबर वगळता 25 सप्टेंबरपासून सेन्सेक्स तेजीसोबतच बंद झाला असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारच्या मोठय़ा घसरणीमुळे येत्या काळात भारतीय शेअर बाजार आता कोणते वळण घेणार, का मागील तेजीचा प्रवास नव्याने सुरु ठेवणार यासह अन्य बाबी येत्या काही दिवसात स्पष्ट होतील असे तज्ञांनी म्हटले आहे.