रिलायन्स नुकसानीत- निफ्टी 18,000 अंकांवर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात प्रमुख कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक या सारख्या कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 396 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 396.34 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 60,322.37 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 110.25 अंकांनी प्रभावीत होत 17,999.20 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, एनटीपीसी आणि सनफार्मा यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील स्थिती
देशातील बाजारात नकारात्मक वातावरण राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारांची स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील चीनचा शांघाय कम्पोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे नुकसानीत राहिले असल्याचे दिसले आहे. हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्की हे मात्र लाभासोबत बंद झाले आहेत. युरोपीय बाजार तेजीसोबत बंद झाला आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.72 टक्क्यांनी वधारुन 82.64 डॉलर प्रती बॅरेलवर पोहोचले आहे.
भारतीय बाजारात प्रामुख्याने चढउताराचे वातावरण राहिले होते, यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावाच्या कारणास्तव काही कंपन्यांच्या समभागांच्या किमती वधारल्याने त्याचा परिणाम हा मागणीवर होत गेल्याने बाजारात उत्साह राहिला नसल्याचे दिसून आले.