निफ्टीचा नवा विक्रम – जागतिक बाजारात मिळताजुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील मिळत्याजुळत्या वातावरणामुळे चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात सेन्सेक्स हलक्या घसरणीसह स्थिरावला असल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु दिवसभरात काही काळ सेन्सेक्सने नवीन उच्चांक प्राप्त करत विक्रम नेंदवला असल्याचेही दिसले आहे.
आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टीसीएसचे समभाग सर्वाधिक एक टक्क्यांपेक्षा अधिक अंकांनी तेजीत राहिले आहेत. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया व आयटीसीचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला बजाज फिनसर्व्ह, टायटन, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
बीएसईमधील प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्सने प्रारंभीच्या कालावधीत आपले सर्व जुने विक्रम मोडीत काढत 56,198.13 अंकांचा नवा टप्पा प्राप्त केला होता. परंतु बाजार बंद होताना मात्र सेन्सेक्स 14.77 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 55,944.21 अंकांवर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.05 अंकांच्या मदतीने निर्देशांक नवा विक्रम प्राप्त करत 16,634.65 वर बंद झाल्याची नोंद केली आहे. यामध्येच आयटी, धातू आणि एफएमसीजी वगळता अधिकच्या क्षेत्रातील समभाग अंतिम क्षणी नुकसानीत राहिले होते.
बाजाराला तेल आणि गॅस आणि धातू समभागांनी चांगला आधार दिल्याचे दिसले. अदानी टोटल गॅसचे समभाग मात्र 5 टक्के इतके दमदार तेजीत होते. याशिवाय हिंदुस्थान पेट्रोलियम, ऑइल इंडियाचे समभागही 3 टक्के तेजीत होते.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग तसेच जपानचा निक्की घसरणीत होते. चीनचा शांघाय कम्पोझिट तसेच दक्षिण कोरियाचा कोस्पी तेजीत राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.36 टक्क्यांनी नुकसानीत राहत 70.16 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.