वीज व ऊर्जा क्षेत्राचे बाजाराला समर्थन ः सलग पाचव्या दिवशी तेजीचे वातावरण
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील भारतीय भांडवली बाजारात दुसऱया दिवशी मंगळवारी व बाजारातील सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात तेजीची झुळूक राहिली होती. दैनदिंन वापरातील साहित्यांची निर्मिती करणाऱया कंपन्यांसह, वीज व ऊर्जा समभागाने तेजी प्राप्त केल्याने भारतीय बाजाराला सावरले आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 20.86 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 58,136.36 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 5.40 अंकांनी तेजी प्राप्त करत निर्देशांक 17,345.45 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारतीय स्टेट बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मंगळवारच्या सत्रात सर्वाधिक लाभात राहिले होते. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, एचडीएफसी लि., लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील संकेताच्या पार्श्वभूमीमुळे हे वातावरण तेजीसाठी पुरक नाही आहे. कारण अमेरिका व चीन यांच्यामध्ये दिवसागणिक वाढत असणाऱया तणावामुळे चिंता निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून आशियाई व पश्चिमी बाजारात नुकसान सत्र राहिल्याने जगातील प्रमुख बाजारात मंदीच्या सावटामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की व हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. याच वेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.72 टक्क्यांनी घसरुन 99.31 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.