सेन्सेक्स 211 अंकांच्या वधारासह बंद , रिलायन्स इंडस्ट्रिज नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअरबाजाराने सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी विक्रमी उंची गाठण्यामध्ये यश मिळवले आहे. देशातील दिग्गज कंपनी रिलायन्ससह इतर कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे शेअरबाजार तेजीसह बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 211 अंकांनी वाढत 62,504.80 अंकांवर नव्या विक्रमी स्तरावर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 51 अंकांच्या वाढीसह 18,562.75 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारात विक्रीचा कल त्याचप्रमाणे चीनमध्ये अस्थिरता असतानाही भारतीय शेअरबाजार सोमवारी डगमगताना दिसला नाही. बाजाराने सलग पाचव्या सत्रामध्ये तेजीचा कल कायम ठेवत गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक भक्कम केला आहे. इंट्रा डे दरम्यान सेन्सेक्सचा निर्देशांक 62,701 अंकांचा नवा विक्रमी टप्पाही पार करू शकला. तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांकानेही 18,604 चा सर्वोच्च स्तर गाठण्यामध्ये यश मिळविले होते. मागच्या वषी 19 ऑक्टोबरला निफ्टीने हा स्तर याआधी गाठला होता. बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सर्वाधिक 3.48 टक्के इतका वाढीव दिसला. याच्यासोबत नेस्ले, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि इंडस इंड बँक यांनीही सर्वाधिक वधारत बाजाराला भक्कम पाठबळ दिले. महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते. याच दरम्यान नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 31,630 कोटी रुपयांची भर घातल्याची माहिती आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा आजही भारतीय बाजारात गुंतवणुकीकडे अधिक कल दिसला आहे. याचदरम्यान, जागतिक बाजारामध्ये काहीसे चढउतार मात्र दिसून आले. अमेरिकेतील बाजार घसरणीत होते. युरोपियन बाजारासह आशियाई बाजारात सर्वच निर्देशांक घसरणीत दिसून आले.