सप्ताहाचा समारोप विक्रमासोबत – एसबीआय मजबुतीमध्ये
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय बाजारात पाचव्या दिवशी सलगची तेजी कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात सेन्सेक्स 117 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु अन्य निर्णयामुळे बाजारात तेजीची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्सने 51,000 अंकांचा टप्पा प्राप्त केला होता. परंतु दिवसअखेर 117.34 अंकांनी सेन्सेक्स वधारुन निर्देशांक 50,731.63 वर बंद झाला आहे. यामध्ये निफ्टीने काही काळ 15,000 चा टप्पा ओलांडल्याचे दिसून आले. दिवसअखेर निफ्टी 28.60 अंकांनी वधारुन 14,924.25 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक 10 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. यासोबतच कोटक बँक, डॉ.रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि एचडीएफसी बँक तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र घसरणीमध्ये ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मारुती आणि एचसीएल टेक यांचा समावेश राहिला आहे.
शुक्रवारी आरबीआयच्या पतधोरण बैठकीचा सकारात्मक कल राहिला होता. यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये बाजारात बॉण्ड आणि किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी तसेच दीर्घकालीन रेपो दर सुलभ राहिल्यास बिगर बँकिंग क्षेत्रातील वित्तसंस्थांसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत मिळणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, अर्थकारण यासोबतच उद्योग क्षेत्र यांच्यात सकारात्मक घडामोडी निर्माण होत असल्याचा लाभ गुंतवणूकदारांना होणार असल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. जागतिक बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की नफ्यात राहिले आहेत. तसेच युरोपमधील प्रमुख बाजारांमध्ये व्यापार तेजीत राहिले होते. याचदरम्यान जागतिक पातळीवरील तेल मानक ब्रेंट क्रूड 0.95 टक्क्यांनी वधारुन 59.56 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले होते.