सेन्सेक्स 28 अंकांनी घसरला – टाटा स्टील नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात समभागांमध्ये उच्चांकी पातळीवर नफा वसुलीचे वातावरण राहिल्याच्या कारणास्तव शेअर बाजारातील निर्देशांक जवळपास स्थिरावत बंद झाले आहेत.
दिवसभरातील कामगिरीनंतर बाजार बंद होताना 28.73 अंकांसोबत 0.05 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 54,525.93 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,282.25 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक म्हणजे चार टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत एनटीपीसी, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला घसरणीमध्ये कोटक बँक, बजाज ऑटो, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे.
जागतिक पातळीवरील वातावरणात आशियातील तसेच अमेरिकेतील शेअर बाजारात विक्रीचा कल राहिला होता याचा प्रभाव भारतीय बाजारावर राहिल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बीएसईकडून समभागांचे भाव तसेच त्यांची वाढ यासह अन्य स्थितीवर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे लहान आणि मध्यम कंपन्यांच्या समभागात विक्रीचा दबाव राहिला होता.
कोरोनाचा कमी होणारा धोका तसेच विविध टप्प्यावरील उद्योग क्षेत्रांमध्ये प्राप्त होणारी तेजी यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा गती निर्माण करत असल्याने याचा सकारात्मक बदल आगामी काळात होणार असल्याचे संकेत असून याचा भारतीय बाजाराला फायदा होणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान सोमवार व मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी तेजीचा सूर कायम ठेवला होता. पण बुधवारी मात्र शेअर बाजारात कमालीचा उतार-चढाव दिसला होता. आशियातील बाजारात शांघाई, हाँगकाँग आणि टोकियो नफ्यात राहिले होते.