बाजारात तेजी परतली ः सेन्सेक्स, निफ्टी 2.5 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमधील मजबूत स्थितीच्या दरम्यान धातू, ऊर्जा आणि बँकिंग कंपन्यांचे समभाग वधारल्याने मंगळवारच्या सत्रात भारतीय भांडवली व राष्ट्रीय शेअर बाजारात 2.5 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. मागील तीन महिन्यांमधील ही एक दिवसाची सर्वाधिक तेजी राहिली असून यामध्ये सेन्सेक्सने 1,345 अंकांची तेजी प्राप्त केली आहे.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1,344.63 अंकांनी वधारुन निर्देशांक 54,318.47 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 417.00 अंकांनी तेजी नेंदवत निर्देशांक 16,259.30 वर बंद झाला आहे. यामध्ये काही वेळ सेन्सेक्सने 1,425.58 अंकांनी उच्चांकी स्थानी राहिला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 7.62 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो. विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, स्टेट बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
शेअर बाजारातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी रिलायन्सचे समभाग हे 4.26 टक्क्यांनी मजबूत राहिले असून ही वाढ मागील एक आठवडय़ातील सर्वोच्च मानली जात आहे. यासह बीएसईमधील स्मॉलकॅपच्या दरम्यान 2.78 टक्के व बीएसई मिडकॅपमध्ये 2.51 टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. यासह जागतिक बाजारात आशियातील हाँगकॉँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट यांचे निर्देशांक हे कोविड प्रतिबंधक नियमांमधून सवलत मिळाल्याने पुन्हा तेजीसोबत झेपावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.49 टक्क्यांनी वधारुन 114.8 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
एक दिवसामधील सर्वोच्च झेप
भारतीय शेअर बाजारात तब्बल 15 फेब्रुवारी 22 नंतर एक दिवसांमधील सर्वोच्च तेजी मंगळवारच्या सत्रात नेंदवली गेली आहे. गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे.