जागतिक बाजारात मिळताजुळता कल – एचडीएफसी बँक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी जागतिक बाजारात मिळता-जुळता कल राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये सुरुवातीला सेन्सेक्सने 56,000चा टप्पा प्राप्त केला होता परंतु अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स प्रभावीत होत बंद झाला. दिग्गज कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीने बुधवारी सेन्सेक्सने 56,118.57 चा नवा टप्पा प्राप्त करत विक्रम नोंदवला आहे. परंतु ही तेजी कायम ठेवण्यास बाजाराला अपयश आल्याने बंद होताना सेन्सेक्स 162.78 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 55,629.49 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,568.85 वर बंद झाला आहे. दिवसभरात निफ्टीने 16,701.85 ची उंची प्राप्त केली होती.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी घसरले असून आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, इंडसइंड बँक तसेच ऍक्सिस बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटो यांचे समभाग लाभात राहिले आहेत.
बुधवारच्या सत्रात भारतीय बाजाराने विक्रमी कामगिरीची नोंद केल्यानंतर अंतिम क्षणी मात्र निर्देशांकात घसरण झाल्याने प्राप्त केलेली तेजी गमावली आहे, तसेच विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स नुकसानीसह बंद झाला आहे. यात प्रामुख्याने खासगी बँकांच्या समभागात घसरण राहिली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातलेली बंदी मागे घेतली आहे. या बँकेच्या समभागात तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकॉगचा हँगसेंग, जपानचा निक्की नफाकमाईत राहिले आहेत.