निफ्टीही तेजीत : मारुती सुझुकी सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्स 657 अंकांनी मजबूत झाला असून यासोबतच सेन्सेक्स निर्देशांकाने 58,000 चा टप्पा पार केला आहे. एकप्रकारे गुंतवणूकदारांमध्ये आता पुन्हा विश्वास परतण्यास सुरूवात झाली आहे, असे म्हणायला जागा आहे.
दुसऱया बाजूला जागतिक पातळीवरील वातावरण मजबूत राहिल्याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 657.39 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,465.97 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 197.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,463.80 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी लाभात राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन, विप्रो आणि भारती एअरटेलसह प्रमुख समभाग वधारुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, आयटीसी आणि पॉवरग्रिडचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि चीनचा शांघाय कम्पोझिट वधारुन बंद झाला आहे. युरोपियन प्रमुख बाजार दुपारपर्यंत तेजीत राहिला होता.
याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (बेंट क्रूड) 0.27 टक्क्यांनी घसरलेले दिसले. शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीत बाजारात मंगळवारी 1,967.89 कोटी रुपयाच्या मूल्याचे समभाग विक्री झाल्याची माहिती आहे. विदेशी मुद्रा विनिमय बाजारात रुपया पाच पैशानी घसरुन 74.79 प्रति डॉलरवर आला आहे.