वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेची माजी टॉप सिडेड आणि जागतिक दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने तब्बल एक वर्षानंतर टेनिस क्षेत्रामध्ये पुन्हा आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. येत्या जूनमध्ये लंडनमध्ये होणाऱया विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याचे सेरेनाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
2021 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर 40 वर्षीय सेरेनाने विश्रांती घेतली होती. आता एक वर्षानंतर ती विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतच आपले पुनरागमन करणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पायाला झालेल्या दुखापतीने तिला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले होते. 2021 मध्ये झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सेरेनाला स्नायुदुखापतीमुळे हुकल्या होत्या. 2022 ची विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा 27 जून ते 10 जुलै दरम्यान खेळविली जाणार आहे. सेरेनाने आतापर्यंत ग्रासकोर्टवरील विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे सातवेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. 2017 च्या कालावधीत तिने चार ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला.