ऑस्ट्रेलिया ओपन : जोकोविच, वोझ्नियाकी, बार्टी, क्विटोव्हा, नेव्हारा, सिलिकची आगेकूच, डिमिट्रोव्ह पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
अमेरिकेची 15 वर्षीय कोको गॉफ, विद्यमान विजेती जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेचीच सेरेना विल्यम्स, सेरेनाची जीवलग मैत्रिण डेन्मार्कची कॅरोलिना वोझ्नियाकी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीत काही मानांकित खेळाडूंना धक्के बसले तर सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने आठव्यांदा जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू गॉफने एका सेटची पिछाडी भरून काढत अनुभवी सोराना सिर्स्टियाचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. ही लढत खूप अवघड होती. पण जिंकण्याच्या तीव्र इच्छेमुळेच मी विजय मिळवू शकलो, असे ती नंतर म्हणाली. पहिल्या फेरीतही तिने व्हीनस विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणले होते. शिवाय गेल्या वर्षीही तिने ग्रँडस्लॅम पदार्पणात विम्बल्डनमध्ये व्हीनसला पराभूत केले होते. तिची पुढील लढत विद्यमान विजेत्या नाओमी ओसाकाशी होणार आहे. यापूर्वी अमेरिकन ओपनमध्ये तिसऱया फेरीत दोघींची गाठ पडली होती. त्यावेळी ओसाकाने गॉफचा सहज पराभव केला होता. 22 वर्षीय ओसाकाने चीनच्या झेंग सायसायवर 6-2, 6-4 अशी मात करून तिसरी फेरी गाठली. दुसऱया सेटवेळी ती काहीशी चिडली होती. रागाच्या भरात तिने रॅकेट भिरकावून दिली होती. अन्य एका सामन्यात माजी अग्रमानांकित वोझ्नियाकीने दोन्ही सेटमध्ये पिछाडीवर पडली असतानाही युक्रेनच्या डायाना यास्त्रsम्स्काचा 7-5, 7-5 असा पराभव केला. तिची पुढील लढत टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉशी होणार आहे. जेबॉने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला 1-6, 6-2, 6-3 असा पराभवाचा धक्का दिला.
सेरेनाची आगेकूच
24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे ध्येय असलेल्या सेरेना विल्यम्सने 70 व्या मानांकित तमारा झिडन्सेकचा 6-2, 6-3 असा पराभव केला. दुसऱया सेटमध्ये तिचा कडवा प्रतिकार झाल्यावर प्रत्येक फटक्यावेळी सेरेना जोरात किंचाळत असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियाच्या जागतिक अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने पोलोना हरकॉगचा 6-1, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. या सामन्यावेळी जोरात थंड वारे वाहत होते. स्पेनच्या कार्ला सुआरेझ नेव्हारोने बेलारुसच्या 11 व्या मानांकित एरीना साबालेन्काचा पराभव करून आगेकूच केली. नेव्हारोने यावर्षी निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीची उपविजेती पेत्र क्विटोव्हाने स्पेनच्या पॉला बॅडोसाचा 7-5, 7-5 तर चीनच्या झँग शुआईने अमेरिकेच्या कॅटी मॅकनालीचा 6-2, 6-4 असा पराभव केला.
जोकोविच, सित्सिपस तिसऱया फेरीत
पुरुष एकेरीत जोकोविचनेही थंड वाऱयाशी मुकाबला करीत जपानच्या वाईल्डकार्ड प्रवेशधारक तात्सुमा इटोचा 6-1, 6-4, 6-2 असा पराभव केला. वाऱयामुळे चेंडू कोठे जातोय हे कळणे कठीण जात होते. पण माझ्या सर्व्हिसने मला अडचणीतून बाहेर काढले, असे तो नंतर म्हणाला. ग्रीसच्या स्टीफानासे सित्सिपसला मात्र एकही फटका न मारता तिसऱया फेरीत स्थान मिळाले. दुसऱया फेरीतील त्याचा प्रतिस्पर्धी फिलिप कोलश्रेबरने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सित्सिपसला पुढे चाल मिळाली. अन्य सामन्यात मारिन सिलिकने पाच सेट्सच्या झुंजीत फ्रान्सच्या बेनोई पेअरचा तर कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने चिलीच्या ख्रिस्तिन गॅरिनचा सरळ सेट्सनी पराभव केला. टेनीस सँडग्रेनने आठव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीचे आव्हान पाच सेट्समध्ये संपुष्टात आणले. अमेरिकेच्या टॉमी पॉलनेही पाच सेट्समध्ये बल्गेरियाच्या 18 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हचा 6-4, 7-6 (8-6), 3-6, 6-7 (3-7), 7-6 (10-3) असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने आणखी एक मानांकित खेळाडू कमी करताना पोलंडच्या 31 व्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाझचा पराभव केला.
स्वित्झर्लंडच्या 38 वर्षीय रॉजर फेडररने तिसरी फेरी गाठताना सर्बियाच्या फिलिप क्रायनोविकचा 6-1, 6-4, 6-1 असा फडशा पाडला. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनशी त्याची पुढील लढत होईल.
पुरुष दुहेरीत दिविज शरण दुसऱया फेरीत, बोपण्णा पराभूत
भारताच्या दिविज शरणने न्यूझीलंडच्या आर्टेम सिटॅकसमवेत खेळताना पाब्लो कॅरेनो बुस्टा व जोआव सौसा यांचा पराभव करून दुहेरीची दुसरी फेरी गाठली. शरण-सिटॅक यांनी प्रतिस्पर्धी जोडीचा 6-4, 7-5 असा पराभव केला. त्यांची पुढील लढत मेट पॅव्हिओ-ब्रुनो सोआरेस आणि बेन मोलाचलान व ल्युक बाम्ब्रिज यापैकी एका जोडीशी होईल. जपानच्या उचियामासमवेत खेळणाऱया रोहन बोपण्णाला मात्र पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. बॉब व माईक ब्रायन बंधूंनी त्यांचा 6-1, 3-6, 6-3 असास पराभ्घ्व केला.
सानिया मिर्झाची मिश्र दुहेरीतून माघार
भारताच्या सानिया मिर्झाने दुखापतीच्या कारणास्तव मिश्र दुहेरीतून माघार घेतली आहे. रोहन बोपण्णासमवेत ती खेळणार होती. उजव्या पायाच्या पोटरीचे स्नायू दुखावल्याने तिने माघार घेतल्याचे सांगितले. मात्र महिला दुहेरीत ती नादिया किचेनॉकसमवेत खेळणार आहे. गुरुवारी त्यांची सलामीची लढत चीनच्या झिनयुन हा व लिन झू यांच्याशी होणार आहे. भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू राजीव राम याच्यासमवेत ती मिश्र दुहेरीत आधी खेळणार होती. पण त्याला ताप आल्याने त्याने माघार घेतल्यानंतर रोहन बोपण्णासमवेत खेळणार होती. सानियाने माघार घेतल्याने आता रोहन बोपण्णा सानियाची दुहेरीची जोडीदार किचेनॉकसमवेत मिश्र दुहेरीत खेळणार आहे.