वांग कियांग, कोको गॉफ, जेबॉ चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत शुक्रवारी महिला एकेरीच्या तिसऱया फेरीत दोन धक्कादायक निकाल लागले. विद्यमान विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान संपुष्टात आले तर माजी विजेत्या सेरेना विल्यम्सलाही चीनच्या खेळाडूने पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले. भरीस भर म्हणजे सेरेनाची जीवलग मैत्रिण कॅरोलिन वोझ्नियाकीलाही पराभव स्वीकारावा लागला. तिची ही शेवटची स्पर्धा असल्याने सामन्यानंतर तिने 16 वर्षाच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीला निरोप दिला. सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, कॅनडाचा मिलोस रेऑनिक, मारिन सिलिक, रॉजर फेडरर यांनी पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठली तर सित्सिपसचे आव्हान तिसऱया फेरीत समाप्त झाले.
24 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सेरेना विल्यम्स खूप धडपड करीत आहे. पण पुन्हा एकदा त्यात तिला अपयश आले. चीनच्या वांग कियांगने तीन सेट्सच्या अटीतटीच्या लढतीत सेरेनाला 6-4, 6-7 (2-7), 7-5 असा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले. विशेष म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये सेरेनाने अमेरिकन ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत कियांगला हरविले होते. त्यावेळी कियांगला सेरेनाविरुद्ध फक्त एक गेम जिंकता आला होता. टेनिस वर्तुळात सनसनाटी निर्माण केलेल्या 15 वर्षीय कोको गॉफने विद्यमान विजेत्या ओसाकाचा 6-3, 6-4 असा केवळ 67 मिनिटांत धुव्वा उडवित चौथ्या फेरीत स्थान मिळविले. तिने पहिल्या फेरीत व्हीनस विल्यम्सचा पराभव केला होता.
वोझ्नियाकीचा निरोप
वोझ्नियाकीला टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉने 7-5, 3-6, 7-5 असे हरविले. वोझ्नियाकीचा हा व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. सामन्यानंतर तिने चाहत्यांचे, कुटुंबियांचे आभार मानले आणि डेन्मार्कच्या राष्ट्रध्वजासह मैदानात तिने निरोपाची फेरी मारली. जेबॉने याआधी जोहाना कोन्टाला व कॅरोलिन गार्सिया यांनाही पराभवाचा धक्का दिला होता. सेरेना व ओसाका पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित ऍश्ले बार्टीच्या मार्गातील प्रमुख अडथळे दूर झाले आहेत. तिने इलेना रिबाकिनाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
100 व्या विजयासाठी फेडररचा संघर्ष
पुरुष एकेरीत नोव्हॅक जोकोविचने जपानच्या योशिहितो निशिओकाचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव करून शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले तर माजी अमेरिकन चॅम्पियन मारिन सिलिकने रॉबर्ट बॉटिस्टा ऍगटचा पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 6-7 (3-7), 6-4, 6-0, 5-7, 6-3 असा पराभव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या टेनीस सँडगेनने आपल्याच देशाच्या सॅम क्वेरीचा सरळ सेट्समध्ये पराभव करून चौथी फेरी गाठली. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमधील शंभरावा विजय नोंदवला खरा. पण त्याला विजयासाठी संघर्ष करावा लागला. स्थानिक खेळाडू जॉन मिलमनने त्याला कडवी झुंज दिली. पण अखेर फेडररने ही लढत 4-6, 7-6, 6-4, 4-6, 7-6 अशी जिंकत आगेकूच केली.
सित्सिपसचे आव्हान समाप्त
अन्य सामन्यात 14 व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनने अर्जेन्टिनाच्या डुसान लॅजोविकचा 6-2, 6-4, 7-6 (9-7) असा पराभव केला. कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने ग्रीसच्या सहाव्या मानांकित स्टीफानोस सित्सिपसचे आव्हान 7-5, 6-4, 7-6 (7-2) असे संपुष्टात आणताना 19 बिनतोड सर्व्हिस केल्या. मारिन सिलिकशी त्याची पुढील लढत होईल.