वृत्तसंस्था/ ऑकलंड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ऑकलंड खुल्या क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विलियम्स तसेच रुमानियाची कॅरोलेनी वोझ्नियाकी यांनी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेरेना विलियम्सने ब्रिटनच्या लॉरा सिग्मंडचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये दीड तासाच्या कालावधीत पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत सेरेनाला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. सेरेनाचा उपांत्यफेरीचा सामना ऍनिसिमोव्हाशी होणार आहे. ऍनिसिमोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कॅनडाच्या बुचार्डवर 6-2, 3-6, 6-4 अशी मात केली. रुमानियाच्या माजी टॉप सीडेड कॅरोलिनी वोझ्नियाकीने जर्मनीच्या चौथ्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसचा 6-1, 6-4 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. अमेरिकेच्या बिगर मानांकित पेगुलाने ऍलेझी कॉमेटवर 6-0, 3-2 अशी मात करत उपांत्यफेरी गाठली. दुखापतीमुळे फ्रान्सच्या कॉमेटने हा सामना अर्धवट सोडला. पेगुला आणि वेझ्नियाकी यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल.