वृत्तसंस्था/ मेलबर्न
अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्स, जपानची ओसाका, रूमानियाची हॅलेप तसेच जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्ह, सर्बियाचा जोकोविच यांनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र ऑस्ट्रीयाचा थिएम, कॅनडाचा रेऑनिक स्पेनची मुगुरूझा आणि साबालेन्का यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात सेरेना विल्यम्सने सातव्या मानांकित बेलारुसच्यासाबालेन्काचा 6-4, 2-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत सेरेनाला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीपासून वंचित व्हावे लागले होते. या लढतीत साबालेन्काने दुसरा सेट जिंकून सेरेनाशी बरोबरी केली होती पण तिसऱया सेटमध्ये सेरेनाने शेवटचे दोन गेम्स जिंकून साबालेन्काचे आव्हान संपुष्टात आणले. सेरेनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रूमानियाच्या द्वितीय मानांकित हॅलेपशी होणार आहे. सिमोना हॅलेपने पोलंडच्या ईगा स्वायटेकचा 3-6, 6-1, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील हॅलेपचा हा 100 वा सामना होता.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील एका सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने स्पेनच्या मुगुरूझाचा 4-6, 6-4, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 2019 साली ओसाकाने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. अलिकडच्या कालावधीत ओसाकाने सलग 18 सामने जिंकले असून त्यामध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाचा समावेश आहे. तैवानच्या 35 वर्षीय बिगर मानांकित हेस सुमेईने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मार्केटाचा व्होड्रोसोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव केला. ओसाका आणि तैवानची वेई यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. या स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात हेस वेईने ऍन्ड्रेस्क्यूचा पराभव केला होता.
पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमला 6-4, 6-4, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य एका सामन्यात रशियाच्या 27 वर्षीय कारात्सेव्ह ने फेलिक्स ऍलिसियामीचा 3-6, 1-6, 6-3, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. डिमिट्रोव्ह आणि कारात्सेव्ह यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. जर्मनीच्या सहाव्या मानांकित ऍलेक्झांडर व्हेरेव्हने रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या 23 व्या मानांकित लेजोव्हिकचा 6-4, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अग्रमानांकित जोकोविचनेही आगेकूच केली असून त्याने कॅनडाच्या मिलोस रेऑनिकचा 7-6 (7-4), 4-6, 6-1, 6-4 असा पराभव केला. त्याची लढत अलेक्झांडर व्हेरेव्हशी होणार आहे.