वार्ताहर/ निपाणी
श्रीपेवाडी येथे असणाऱया निपाणी औद्योगिक वसाहतीतील भूखंड सेलडीड करण्याकरिता संस्था चालढकल करत आहे. यासाठी औद्योगिक वसाहत एक खिडकीअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची सुनावणी शुक्रवारी झाली. यामध्ये जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी औद्योगिक वसाहतीचे जिल्हा उपसंचालक दोड्डबसवराज व सहकारी संस्थांचे जिल्हा संचालक श्रीनिवास यांच्यावर जबाबदारी सोपविताना सेलडीडविषयी पदाधिकारी व सभासदांची बैठक घेऊन तात्काळ निर्णय घ्या अन्यथा संचालक मंडळ बरखास्त करु, असा इशारा दिला.
औद्योगिक विकास निगम, सहकार खाते या अधिकाऱयांच्या उपस्थितीत बेळगाव येथे निपाणी औद्योगिक वसाहत प्लॉट सेलडीडविषयी सुनावणी झाली. यावेळी सभासद कारखानदारांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱयांनी सूचना दिल्या.
यावेळी काही संचालकांसह सभासद कारखानदारांनी आपले म्हणणे मांडताना औद्योगिक वसाहतीचा इतिहास व सद्यःस्थिती याची सविस्तर माहिती दिली. कारखाने उभे करताना प्लॉट लिजवर घेतेवेळी संस्थेला प्रति चौरस फूट 12 रुपये प्रमाणे रक्कम अदा केली आहे. विकासनिधी दिला असताना संस्था शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रति चौरस फूट 3 पैसे दराने सेलडीड करून देणे आवश्यक आहे. यासंबंधी वार्षिक सभेत ठरावही मंजूर केला आहे. तरीपण संस्थेकडून चालढकल होत आहे. यातून संस्थेच्या 12 पैकी उपाध्यक्षांसह 8 संचालकांनी ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने अध्यक्षांविरोधात अविश्वासाची तक्रारही दाखल केली आहे.
सध्या सर्वच कारखानदार व्यावसायिक मंदीतून कर्ज व व्याजाच्या बोजाखाली दबले आहेत. काही कारखानदारांना तर बँकांनी लिलावाच्या नोटीसा बजावल्या आहेत. या सर्व अडचणींतून प्लॉटचे सेलडीडच तारु शकते. यासाठी ठरलेल्या 3 पैसे दरानेच सेलडीड व्हावे, अशी मागणी केली.
बैठकीकडे सर्वांच्या नजरा
कारखानदार संचालक व सभासद यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना सूचना दिल्या. येत्या 15 दिवसात हा विषय निकालात काढा. याकरिता पदाधिकारी व सभासदांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घ्या. हे न झाल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करु, असा इशाराही दिला. यामुळे सभासदांच्या आशा उंचावल्या असून बैठक कधी होणार? याकडे नजरा लागल्या आहेत.