काही महिन्यांपूर्वीपर्यंत सेल्फी हा परवलीचा शब्द होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपानंतर सोशल मीडियावर मास्कीची चलती आहे. ‘मास्की’ म्हणजे मास्क घातलेले फोटो किंवा सेल्फी.
कोरोनामुळे बाहेर जाताना मास्क घालणं गरजेचं बनलं आहे. म्हणूनच आता मास्क घालूनच सेल्फी काढावी लागणार आहे. म्हणूनच ही सेल्फी नाही तर ‘मास्की’ असेल. सोशल मीडियावर मास्कीची चलती आहे. मास्कमुळे अर्धा चेहरा झाकलेला असताना सेल्फी काढणं हे कौशल्याचं काम तर आहेच शिवाय हे आव्हानात्मकही आहे. मास्कसह सेल्फी काढताना चेहर्याच्या खालच्या भागाऐवजी डोळ्यांना खूप महत्त्व आलं आहे. म्हणूनच जगभरात डोळ्यांशी संबंधित सौंदर्यप्रसाधनं, मेक अप प्रोडक्ट्सच्या मागणीत वाढ होत आहे. सेल्फीसाठी पोझ देताना कल्पकतेचा कस लागणार आहे. सेल्फीसाठी उभं राहताना, उडी मारताना किंवा वाकताना आपण मास्क घातलं आहे याचं भान ठेवावं लागणार आहे.
मास्की चांगली येण्यासाठी तुम्ही कुठे जाताय आणि कोणत्या वेळी जाताय हे लक्षात घेऊन मास्क निवडा. डोळ्यांच्या मेक अपकडे विशेष लक्ष द्या. भुवयांना नीट आकार द्या. पापण्यांचं सौंदर्य खुलवा. मास्क आणि पेहरावानुसार ऍक्सेसरीज निवडा.