सोमवारी पहिल्याच दिवशी 137 वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई
वार्ताहर/ कराड
आशियाई महामार्गावरील कराड ते मलकापूर दरम्यानच्या सेवारस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर सोमवारपासून वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी पहिल्याच दिवशी एकूण 137 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर नाका ते मलकापूर येथील गंधर्व हॉटेल दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या सेवारस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे पार्किंग होत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जाणाऱया रुग्णांनाही वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी गंभीर रुग्ण वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. कृष्णा रुग्णालय परिसरातील महामार्ग वगळता जवळपास सर्वच रस्त्यांवर पार्किंग होत असल्याने वाहनचालकांबरोबरच येथील नागरिकांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
या मार्गावर नियमित होणाऱया वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेने संगम हॉटेल ते गंधर्व हॉटेल व कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका दरम्यानच्या सेवारस्त्यावर नो पार्किंग झोन केलेला आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र व्यापारी व नागरिकांनी या निर्णयास संमती दर्शवल्याने वाहतूक पोलिसांच्या वतीने सोमवारपासून प्रत्यक्षात कारवाईस प्रारंभ करण्यात आला. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी पहिल्या दिवशी एकूण 137 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापुढे सेवारस्त्यावरील नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर नियमित कारवाई कररण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने पार्क करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.