ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांना करता येणार अर्ज
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे संकटात असलेल्या श्रमिक व गरीबांना विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांनाही या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. आर्थिक मदतीसाठी गुरुवारपासून ‘सेवा सिंधू’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन परिवहन खात्याने केले आहे.
लॉकडाऊनमुळे खासगी प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सी चालक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना एका वेळेसाठी 3 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 पासून सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज दाखल करता येणार आहे.
मागील वर्षीही लॉकडाऊन कालावधीत ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. मागील वर्षी 2,45,852 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 2,507 अर्ज अवैध ठरले होते. तर 27,733 अर्जांसोबत देण्यात आलेली कागदपत्रे समर्पक नव्हती. मागील वर्षी 117.5 कोटी रुपये मदत स्वरुपात देण्यात आले होते. यंदा देखील मदतीसाठी 2.45 लाख अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी…
- 24 एप्रिल 2021 पर्यंत मुदत असणारे ड्रायव्हिंग लायसन्स.
- एका वाहनासाठी एकानेच अर्ज करावा.
- आधारकार्ड, वाहन नोंदणी क्रमांक.
- आधार क्र., पॅनकार्ड लिंक असणाऱया बँक खात्याचा तपशिल.