चतुर्थवार्षिक पाहणीदरम्यान पालिका कर्मचारी मागतोय चिरीमिरी, मुख्याधिकाऱयांचे नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी /सातारा
सातारा शहरात अनेक इमारती उभ्या राहतात, बांधल्या जातात. त्या इमारतींची मालमत्ता सदरी सातारा पालिकेत नोंद करणे आवश्यक असते. एसटी महामंडळाच्या जागेवर प्रशस्त अशी उभी राहिलेली सेव्हन स्टारच्या इमारतीची मालमत्ता सदरी नोंदच नसल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांचा निदर्शनास आलेला असून त्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या पथकाने त्या इमारतीची पाहणी करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, सदरबाजार परिसरात चतुर्थवार्षिक पाहणी दरम्यान, पालिकेचे कर्मचारी हे कर कमी करण्यासाठी पैसे मागणी करत असल्याच्या तक्रारी आल्याने त्या अनुषंगाने तशी कोणाकडे पैशांची मागणी होत असले तर थेट संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी केले आहे.
शहरात दररोज नवनवीन इमारती उभ्या राहतात. त्या इमारती उभ्या करत असताना शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती प्रक्रिया पूर्ण केली नाही तर कायद्याच्या कचाटय़ात अडकले जाते. मात्र, सातारा शहरात अनेक इमारती उभ्या करत असताना त्यांची नोंदणीच झाली नाही तर कोणी बांधकाम परवानाच घेतला नाही, अशा त्रुटी समोर येत आहेत. त्यामध्ये सेव्हन स्टार इमारत सुमारे सहा वर्षापूर्वी एसटी महामंडळाच्या जागेवर बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या करारानुसार बांधण्यात आली. त्यामध्ये अनेकांनी व्यावसायिक गाळे भाडय़ाने घेऊन व्यवसाय सुरु केला. तर काहींनी हॉटेल्स, कॅफे सुरु केले मल्टीफ्लेक्स थिएटरही सुरु करण्यात आले आहे. मात्र, एवढे सारे होत असताना या इमारतीची सातारा पालिकेच्या दप्तरी मालमत्ता करात नोंद नाही. आतापर्यंत या इमारतीमध्ये कोटय़ावधी रुपयांची उलाढाल झाली असेल. परंतु पालिकेच्या पदरी शुन्यच हाती असे वास्तव चित्र सध्या उघडकीस आले आहे. त्यावरुन अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी लगेच चतुर्थवार्षिक पाहणी करणाऱया पथकास पाठवून त्या इमारतीची पाहणी करण्यास सांगितली आहे. त्यानुसार लगेच मालमत्ताकरात नोंदणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सदरबझारमध्ये पाहणी करणारे कर्मचारी मागताहेत चिरीमिरी
सध्या शहरात चतुर्थवार्षिक पाहणीचा कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत सदरबझार येथेही पाहणी केली जात असून काही कर्मचारी हे ज्यांच्याकडे भाडेकरु आहेत. त्यांना भाडे जास्त होईल अशी भीती दाखवून तुम्हाला कर कमी येईल अशी नोंद करतो माझे भागवावे लागेल असे उघडउघड पैसे मागत असल्याची तक्रार ‘तरुण भारत’कडे आल्यानंतर त्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांना विचारणा केली असता तसे कोणी पैसे मागणी करत असले तर माझ्याकडे लेखी अथवा प्रत्यक्ष भेटून आपले म्हणणे द्या. संबंधिताची चौकशी करतो. असे त्यांनी सांगितले.