कोविड योद्धा वृषाली बिले यांचे पनवेल सोसायटीत अनोखे स्वागत : दोन दिवसाच्या सुट्टीनंतर झाल्या पुन्हा रुग्णालयात रुजू
संग्राम कासले / मालवण:
देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज आहे. मूळ मालवण येथील व सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणाऱया वृषाली सूर्यकांत बिले यांनी 45 दिवस अंधेरीतील सेव्हन हिल हॉस्पिटल येथे नर्स म्हणून सेवा बजावली. सिंधुकन्या वृषाली बिले यांनी कोरोना रुग्णांसाठी बजावलेली ही सेवा आदर्शवत आहे. वृषाली यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्या पनवेल येथील सोसायटीमध्ये अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणाऱया वृषाली बिले यांचे माहेर मालवण येथे आहे. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण टोपीवाला हायस्कूल व कणकवली कॉलेज येथे झाले. नंतर त्यांनी मुंबई-सायन हॉस्पिटल येथून आपले नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. गेली 18 वर्षे त्या नर्स म्हणून सेवा बजावत आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये त्या 11 वर्षे नर्स म्हणून कार्यरत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना 12 मेपासून अंधेरी सेव्हन हिल येथे रुजू व्हावे लागले होते.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
‘तरुण भारत’शी बोलताना वृषाली बिले म्हणाल्या, 12 ते 26 मे या कालावधीत आपण अंधेरी सेव्हन हिल येथे नर्स म्हणून सेवा बजावली. ही सेवा बजावताना पती सूर्यकांत बिले यांचा मला पाठिंबा मिळाला. त्यांनी घरची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला निर्धास्तपणे रुग्णालयात सेवा बजावता आली. भाऊ रुपेशनेही भक्कम आधार दिला. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना मानसिक आधार मिळाला. मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण जास्त होते. यात काही कुटुंबेही कोरोना पॉझिटिव्ह सापडत होती. परंतु मे महिन्याच्या अखेरीस रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे हे दिलासादायक चित्र आहे.
स्वत:ची काळजी स्वत:च घ्या!
वृषाली म्हणाल्या, कोरोनाबाबत लोकांच्या मनातील गैरसमज दूर झाले पाहिजेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. मी रुग्णालयात सेवा बजावताना गरम पाणी, सी जीवनसत्व असलेला आहार घेण्यावर भर दिला होता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. फक्त जुनाट आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे. नातेवाईक दूर असतील, तर दूरध्वनी, सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्क साधून आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे.
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू
वृषाली बिले सेव्हन हिल रुग्णालयातून 45 दिवस सेवा बजावून पनवेल येथे आपल्या घरी आल्या. त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी दोन्ही बाजूला उभे राहून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या अनोख्या स्वागताने वृषाली भारावून गेल्या. त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रजा देण्यात आली होती. त्यानंतर लगेच त्या नर्स म्हणून सेवा बजावण्यासाठी सायन रुग्णालयात सज्ज झाल्या आहेत.