प्रतिनिधी/ सातारा
विविध स्तरावरील अधिकारी बणविण्याकरिता विशेषतः लष्करी दलातील अधिकारी बनविण्याकरिताचे प्रशिक्षण सैनिक स्कुलमध्ये देण्यात येते. राज्यातील एकमेव सैनिक स्कुल हे साताऱयात असुन येथुन अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन वरिष्ठ विविध दलात विशेषतः लष्करी दलात अधिकारी पद भूषावित आहेत. यंदापासुन याच सैनिक स्कुलमध्ये मुलींना ही प्रवेश देण्यात येत आहे. याची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामध्ये सातारा जिल्हय़ातील एकुण चार मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.
यंदा याकरीता एकुण 1 हजार 450 अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी केवळ 10 जागांवरच विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येणार होता. यामध्ये दोन विद्यार्थीनी या इतर राज्यातील व उर्वरित या महाराष्ट्रातील आहेत. तब्बल 61 वर्षांनी सैनिक स्कुलचे दरवाजे हे मुलींच्या प्रवेशाकरीता खुले झाले असून, यामध्ये सातारा जिल्हय़ातील विद्यार्थीनींचा समावेश आसणे हे ही अभिमानास्पद आहे. इयत्ता 6 ते 12 पर्यंतचे शिक्षण या शाळेत दिले जाते.
यंदापासुनच मुलींना प्रवेश देण्यात आल्याने येथे मुलींकरीता स्वातंत्र्य अशी निवासाची सोय ही करण्यात आली आहे. तसेच महिला कर्मचारी व शिक्षकवर्गांची ही निवड करण्यात आली आहे. लेखी, तोंडी व शारीरिक गुणवत्तेनुसार या विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी शाळेत प्रवेश देण्याची संख्या ही वाढणार असल्याचे अधिकारी वर्गांकडुन सांगण्यात आले आहे. दि. 17 फेब्रुवारी पासुन या विद्यार्थिनींना या शाळेत प्रवेश देण्यात आला असून त्यांची शैक्षणिक घौडदौड आत्ता सुरू झाली आहे.
यंदा प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थीनींमध्ये अंशिका शामराव ननावरे (शिंपीमळा, पवारवाडी, ता. खटाव जि. सातारा), सिध्दी रोहन रावखंडे (लोणंद जि. सातारा), सिध्दी संदिप गंगतिरे (फलटण जि. सातारा), पीयूशा जितेंद्र चव्हाण (तळिये, ता. कोरेगाव जि. सातारा) या सातारा जिल्हय़ातील विद्यार्थीनी असुन उत्तरा जयंत भवाल (पनवेल, जि. रायगड) याना शंकर तोटावार(लातुर), रिया महेंद्र धोंडी (जि. पालघर), श्रावणी दिपक वाघ (इंदापुर, जि. पुणे), व इशा कुमारी (पश्चिम बंगाल), आदिती संजयकुमार कश्यप (बिहार) यांचा समावेश असुन सर्व मुली निवासी आहेत. तर श्रेया अंगद, प्रतिक्षा सोनावर व वैभवी रोड्डे या सैनिक स्कूलच्या स्टाफ मेंबरच्या मुली असल्याने त्या अनिवासी आहेत.