जम्मूच्या सुंजवानमध्ये दिसला ड्रोन – 3 दिवसात अशी तिसरी घटना
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मूमधील सुंजवाद सैन्य तळानजीक सोमवारी रात्री उशिरा संशयास्पद ड्रोन दिसून आला आहे. कुंजवानी आणि कालूचक भागातही ड्रोन दिसल्याचे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले असले तरीही याची पुष्टी मिळू शकलेली नाही. तिन्ही ठिकाणी एकच ड्रोन दिसला का ते वेगवेगळे ड्रोन होते हे देखील स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मागील काही दिवसांत ड्रोनशी संबंधित ही तिसरी घटना आहे. यापूर्वी शनिवारी रात्री वायुदलाच्या तळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. दुसरी घटना रविवारी झाली होती. यात कालूचक सैन्यतळानजीक ड्रोन उडताना दिसून आले होते.
एनएसजीचे स्पेशल बॉम्ब स्क्वॉड टीम वायुतळावरील स्फोटाचा तपास करत आहे. आतापर्यंतच्या तपासात आरडीएक्स आणि टीएनटी स्फोटक पदार्थ वापरण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ड्रोनला सीमेच्या पलिकडून पाकिस्तानातून नियंत्रित केले जात होते, असेही सांगण्यात येत आहे. पण तपास यंत्रणा स्थानिक हँडलर सामील असणार या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत.
एनआयएकडे चौकशी
गृह मंत्रालयाने जम्मू वायुतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सोपविली आहे. यापूर्वी विमानतळ प्राधिकरण, स्थानिक पोलीस आणि एनएसजी याप्रकरणी तपास करत होते.
2 ड्रोन नजरेस
जम्मू वायुतळावर ड्रोन हल्ल्याच्या दुसऱयाच दिवशी कालूचक सैन्य तळाच्या परिसरात 2 ड्रोन दिसून आले होते. सैन्याने हे ड्रोन पाडविण्यासाठी गोळीबार केला होता. पण काळोखात हे ड्रोन गायब झाले होते. सैन्याने पूर्ण परिसरात मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम राबविली होती. रविवारी रात्री 11.30 आणि त्यानंतर रात्री 1.30 वाजता मानवरहित यान सैन्यतळाच्या परिसरात दिसून आले होते.
देशात पहिल्यांदाच ड्रोनने हल्ला
दोन दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारदरम्यान रात्री जम्मू वायुतळावर ड्रोनने दोन स्फोट घडवून आणले गेले होते. या हल्ल्यात वायुतळाच्या छताला नुकसान पोहोचले होते आणि 2 वायुसैनिक जखमी झाले होते. ड्रोनद्वारे वायुतळामध्ये दोन आयईडी पाडविण्यात आले होते. या स्फोटात फारसे नुकसान झालेले नाही. वायुतळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला ठरविले होते. या हल्ल्यानंतर काही वेळातच लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला 6 किलो वजनाच्या स्फोटकांसह अटक करण्यात आली होती.
पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक – शाह, राजनाथ सिंग यांच्यासह डोवाल सामील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भाग घेतला आहे. या बैठकीत भारतीय वायुतळावरील ड्रोन हल्ल्यासंबंधी चर्चा झाल्याचे समजते.या बैठकीत संरक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांवर चर्चा झाली आहे. संरक्षण दलांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यावरही चर्चा झाली आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तरुणाईचा अधिक सहभाग, स्टार्टअप फर्म्स आणि स्ट्रटेजिक कम्युनिटीला सामील करण्यावरही बैठकीत विचारविनिमय झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील सैन्यतळावरील ड्रोन हल्ल्याचा कटाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघातही उपस्थित झाला आहे. दहशतवादी कारवायांसाठी ड्रोनच्या वापराच्या शक्यतेवर जागतिक समुदायाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात म्हटले आहे.