सीडीएस रावत यांच्या निधनाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर चालू आठवडय़ात पहिल्यांदाच सैन्याचे सर्व कमांडर्स राजधानीत असणार आहेत. 23 आणि 24 डिसेंबर रोजी होणाऱया बैठकीत चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सुरक्षेच्या स्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये वायुदलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि 12 अन्य सैन्याधिकाऱयांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच सैन्याचे सर्व कमांडर 23-24 डिसेंबर रोजी होणाऱया या बैठकीत जमून चीन-पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा स्थितीवर चर्चा करतील.
यादरम्यान सर्व कमांडरांना सुरक्षा स्थितीबद्दल माहिती देण्यात येणार आहे. यात विशेषकरून चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील मुद्दा चर्चेत राहणार आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर कडाक्याच्या थंडीतही चीनने अलिकडच्या काळात मोठय़ा संख्येत सैनिकांना तैनात केले आहे. यादरम्यान सैन्यातील सुधारणांवरही विचारविनिमय केला जाऊ शकतो.
सीडीएस नियुक्तीची प्रक्रिया
अरुणाचल प्रदेशपासून लडाखपर्यंत चीनला लागून असलेल्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी सैन्याच्या पूर्व, मध्य आणि उत्तर कमांडकडे आहे. चीनसोबतच्या सीमेवरील सर्वात मोठय़ा हिस्स्याची सुरक्षा पूर्व कमांडकडे आहे. सीडीएस रावत यांच्या निधनानंतर केंद्र सरकार त्यांच्या उत्तराधिकाऱयाच्या निवडीच्या प्रक्रियेत असून याकरता संरक्षण मंत्रालयाकडून पाऊल उचलण्यात आले आहे.