मिणचे खुर्द / वार्ताहर
महालवाडी तालुका भुदरगड येथील युवक कु. सुरज मारुती इंदुलकर वय वर्षे 19 याचा आज सकाळी पहाटे सैनिक भरतीसाठी सराव करत असताना गावाशेजारी रस्त्यावर धावताना अचानक मृत्यू झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आई वडील मोलमजुरी करून एकुलत्या एक मुलग्याला मोठे केलं. याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
आपलं दारिद्रय कुठे तरी संपणार या आशेवर असणाऱ्या आई-वडिलांना अचानक मोठा धक्का देऊन सूरजने या जगाचा निरोप घेतला. त्याचे स्वप्न होतं देशासाठी फौजी होण्याचं. दररोज सराव करण्यासाठी सकाळी पहाटे लवकर उठून जायचा. आजही तसाच आईला मी जातो ग असे सांगून घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही.
सुरजच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ज्यांच्याकडे पाहून काबाड कष्टातून संसार करणारी त्याच्या आई वडिलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावाला लळा लावणारा, सतत आनंदी हसतमुख चेहरा, मित्रपरिवारात रमणारा हरहुन्नरी सुरजच्या जाण्याने संपूर्ण गावाला शोककळा आली आहे.