शिवाजी विद्यापीठ प्रशासनासह शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. आर जी. सोनकवडे यांच्या `मायक्रोवेव्ह इंन्ड्युस्ड केमिकल इचिंग ऑफ एलआर-15 टाइप-2, सॉलिड स्टेट न्यूक्लिअर डिटेक्टर’ या महत्त्वपूर्ण संशोधनाला 29 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पेटंट जाहीर झाले आहे. इंटरयुनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर, नवी दिल्ली (आय.यु.ए.सी.) या विज्ञान संस्थेमार्फत त्यांनी 28 डिसेंबर 2010 रोजी भारत सरकारकडे हा अर्ज दाखल केला होता. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सदर पेटंट जाहीर झाले आहे.
डॉ. आर. जी. सोनकवडे हे शिवाजी विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी नवी दिल्लीतील इंटरयुनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर येथे कार्यरत होते. तेव्हापासून ते या विषयावरील संशोधन करीत होते. मायक्रोवेव्ह लहरींचा वापर करून साधारणपणे किती किरणोत्साराची मात्रा एखाद्या व्यक्तीसाठी पुरेशी ठरेल आणि त्यायोगे न्यूक्लियर ट्रक व्यवस्थितरित्या पाहणे सुलभ व्हावे यावर हे संशोधन केंद्रित आहे. न्युक्लिअर ट्रक व्यवस्थित पाहता आले तरच किरणोत्सर्गाची मात्रा अचूक प्रमाणात दिली गेली आहे की नाही, हे समजू शकते. चुकीच्या किरणोत्सर्ग मात्रेचे अनेक दुष्परिणाम मानवावर होऊ शकतात. याकरिता किरणोत्सर्गाचे अचूक प्रमाण मिळविण्याकडे त्यांनी संशोधन केंद्रित केले.
या अभिनव संशोधनासाठीचा संपूर्ण खर्च आय. यु. ए. सी.चे तत्कालीन संचालक डॉ. अमित रॉय यांनी संस्थेमार्फत केला. मायक्रोवेव्हचे ट्रे आणि बाऊल यांना किरणोत्सारामुळे जाणारे तडे हा संशोधनाच्या परीक्षणातील अडथळा होता. त्यावरही त्यांनी मात करीत पेटंटमधील बराचसा भाग हा धोरणात्मक व संरक्षणविषयक बाबींशी निगडित असल्याने भारत सरकारकडून पेटंट प्राप्त होण्यात अडचणी होत्या. अखेरीस संशोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय पेटंट प्रदान करण्यात आले. या पेटंटचे संपूर्ण श्रेय हे आपले सहकारी, विद्यार्थी आणि संशोधनाला सहकार्य करणाऱया आय. यु. ए. सी. आणि शिवाजी विद्यापीठ या संस्थांना असल्याची प्रतिक्रिया डॉ. सोनकवडे यांनी दिली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी डॉ. सोनकवडे यांचे अभिनंदन केले आहे.