प्रतिनिधी/ निपाणी
श्रीगणेश प्रतिष्ठापनेनंतर महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया तसेच कुटुंबात सुखसमृद्धी घेऊन येणाऱया गौराईचे आगमन मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर निपाणीसह परिसरात घरोघरी महिला तसेच युवती व लहान मुलींचीही गौरीच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. गौरीचा साजशृंगार, आरास, पूजा मांडण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीमध्ये महिला वर्ग गुंतला आहे.
गौरी तीन दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून येते. त्यानुसार मंगळवारी आगमन, बुधवारी पूजन व गुरुवारी नैवेद्य दाखवून गौरी विसर्जन होणार आहे. गेल्या चार दिवसापासून निपाणीत गौरीचे मुखवटे खरेदीसाठी वर्दळ दिसून आली. गौरी काळात रोज रात्री महिला वर्गातून गौरी जागरणावेळी सादर केल्या जाणाऱया गाण्यांना मात्र यंदा कोरोनाने बेक लागला आहे. मात्र भक्तिभावाने गौरी पूजनासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे दिसत आहे.