संगमेश्वर / प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु होवून जवळपास सहा वर्षे झाली . सन २००० साली या महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करुन , वेगाने वाहतूक सुरु करण्याचे स्वप्न अधूरेच राहीले असून अकार्यक्षम ठेकेदार , अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे अनेक ठिकाणी कामे रखडलेली आहेत . संगमेश्वरच्या दुतर्फा आरवली ते बावनदी या अती अपघात प्रवण क्षेत्रातील काम ठप्प असल्याने वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली असतांना संगमेश्वर येथे १९३७ साली उभारलेल्या सोनवी पूलाला पर्याय म्हणून नवीन पूलाचे काम ए बी सी या कंपनी मार्फत येत्या १५ दिवसांत सुरु होणार आहे .
आरवली ते बावनदी दरम्यान १२ छोटे मोठे पूल आहेत . वांद्री जवळ सप्तलिंगी येथे सहा वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पूलांच्या कामांचा शुभारंभ झाला . मात्र शुभारंभानंतर वर्षभरातच या पूलासह अन्य पूलांची कामे सलग पाच वर्षे रखडली . सुस्त ठेकेदार , पाठपुराव्याचा अभाव , अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सोशिक जनता यामुळे आरवली ते बावनदी या अती अपघातप्रवण क्षेत्रातील काम प्राधांन्याने होणे आवश्यक होते , तेच रखडले . ज्या क्षेत्रात आजवर सर्वाधिक अपघात झाले त्याच ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट स्थितीत कामे करुन अपघात घडण्यास जणू निमंत्रण देण्याची परिस्थिती निर्माण करुन ठेवली .
पाच वर्षांनंतर रखडलेल्या १२ पूलांची कामे मंदगतीने का होइना सुरु झाली . यामध्ये सप्तलिंगी , कोळंबे , शास्त्रीपूल , गडनदी पूल यांचा समावेश आहे . असे असले तरी , संगमेश्वर येथील प्रसिध्द सोनावी पूलाला पर्याय काय ? हा प्रश्न संगमेश्वरवासीयांना नेहमीच पडत राहिला . सोनवी चौका जवळ असणाऱ्या या पूला बाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या . ब्रिटिश सरकारने १९३७ साली उभारलेल्या या पूलाला ७५ वर्षे पूर्ण होवून गेली . सद्यस्थितीत हा पूल अवजड वाहने जातांना जोरात हलतो . दरम्यान पूलावरुन जाणारे पादचारी जीव मूठीत धरुन प्रवास करतात . परिणामी नवीन सोनवी पूलाचे काम कधी सुरु होणार ? असा प्रश्न संगमेश्वरवासीयांना कायम पडत आला . आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून येत्या १५ दिवसात नवीन सोनवी पूलाचे काम सुरु होणार आहे .
राष्ट्रीय महामार्गावर सप्तलिंगी , कोळंबे , शास्त्रीपूल येथील पूलांची कामे करणारी ए बी सी कंपनीच सोनवी पूलाचे काम करणार आहे . येत्या १५ दिवसांत या पूलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे . सोनवी पूलाच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे प्रथम हटविणे आता क्रमप्राप्त ठरणार असून येथे वाहतूक कोंडीचा देखील मोठा प्रश्न उभा रहाणार आहे . संगमेश्वर सोनवी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच उभा रहात असून आता नव्याने पूलाचे काम सुरु होणार असल्याने येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीसाची नियूक्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे . दरम्यान कामाचा प्रारंभच न झालेल्या सोनवी पूलाला आता ७५ वर्षांनी पर्यायी पूल मिळणार असल्याने संगमेश्वरवासीयांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे .