लोकांकडून कचऱयाच्या पिशव्या फेकण्याचे वाढते प्रकार
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा यार्डातील कचरा शेडमधील कचऱयावर प्रक्रिया करण्याच्या बाबतीत मडगाव पालिकेला समस्यांचा सामना करावा लागत असून त्यामुळे शेड भरलेली राहत आहे. यामुळे काही वेळा शेडच्या बाहेर रस्त्यांच्या कडेला ट्रक खाली करावे लागतात. त्यातच सोनसडा यार्डनजीकच्या रस्त्यांच्या कडेला राय, कुडतरी भागांतील लोक कचरा भरलेल्या पिशव्या फेकून देत असल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
मडगाव पालिका क्षेत्रातून दैनंदिन 40 ते 45 टन कचरा गोळा होत असतो. त्यातच पंचायत भागांतील कचरा पालिका क्षेत्रात वा पालिका व पंचायतीच्या सीमेनजीक टाकण्याचे प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. पालिकेने अशा जागांची ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद केलेली असून पालिकेने यासंदर्भात सरकार व स्थानिक पंचायतींकडे पत्रव्यवहार करून असे प्रकार रोखण्याचे आवाहन केले आहे तसेच कित्येकांना रंगे हाथ पकडून दंड ठोठावलेला आहे.
मात्र असे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. सोनसडा यार्डनजीकच्या परिसरातून जाणाऱया कुडतरी रस्त्याच्या दुतर्फा कचरा भरलेल्या पिशव्या फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाने पावसात कचरा कुजून दुर्गंधी सुटत असल्याची कैफियत नजीकच्या रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिका तसेच संबंधित पंचायतीने साफसफाईसाठी आवश्यक कृती करावी, अशी मागणी होत आहे.