प्रतिनिधी / मडगाव
सोनसडा येथील कचऱयाच्या ढिगाऱयांचे बायोरेमेडिएशन पुन्हा सुरू झाले आहे. पावसाळय़ात हे काम बंद ठेवण्यात आले होते. ते दोन दिवसांपूर्वी पूर्ववत सुरू करण्यात आले असून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून (जीडब्ल्यूएमसी) नियुक्त कंत्राटदारापुढे येत्या पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात अ?ाले आहे.
येत्या काही दिवसांत अतिरिक्त यंत्रांच्या उपाययोजनेसह सोनसडा येथे काम पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. जीडब्ल्यूएमसीने कॉमेक्स कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेडभोवती 3000 चौरस मीटर जमीन उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मडगाव पालिकेला त्या ठिकाणी नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास याची मदत होणार आहे.
घनकचरा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टीन्स म्हणाले की, महामंडळाचे उद्दिष्ट सोनसडय़ावरील कचऱयाच्या ढिगाऱयांचे बायोरेमेडिएशन येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचे आहे. बायोरेमेडिएशन प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱया टाकावू कचऱयाची (आरडीएफ) उचल करून हा कचरा कर्नाटकमधील सिमेंट उत्पादक कारखान्यांना पाठविण्यास विलंब झाल्यास सोनसडय़ावरील कचऱयाचे ढिगारे साफ करण्याच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
आम्ही कंत्राटदाराला पावसाळय़ापूर्वी कचऱयाचे ढिगारे साफ करावेत यासाठी सोनसडा येथे अतिरिक्त यंत्रसामग्री तैनात करण्यास सांगितले आहे. कर्नाटकातील सिमेंट कारखान्यांना केवळ गोव्यातून आरडीएफ कचरा मिळत नाही, तर इतर राज्यांमधूनही तेथे कचरा पाठविण्यात येतो. आम्हाला माहिती मिळाली आहे की, हे सिमेंट कारखाने सध्या साठवणुकीच्या समस्येला तोंड देत आहेत. त्यामुळे आरडीएफची उचल करण्यावर बंधने येऊ शकतात व त्याचे परिणाम कचऱयाच्या ढिगाऱयांवरील बायोरेमेडिएशनवर होऊ शकतात, असे मार्टीन्स यांनी सांगितले.